१० सहस्र कोटी रुपये मिळकतकर थकीत
पुणे – शहराची मिळकतकराची थकबाकी १० सहस्र कोटी रुपयांवर गेली आहे. थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी महापालिकेकडून कठोर उपाययोजना करण्यात येत आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसांपासून थकबाकीदार यांची नळजोडणी तोडण्याचे काम चालू केले आहे. त्यासाठी महापालिकेने परिमंडळनिहाय पथकांची नियुक्ती केली आहे. मध्यवर्ती वसुली पथकासोबत १ प्लंबर (नळ दुरुस्ती करणारा), ३ बिगारी, विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक यांच्या पथकाद्वारे थकबाकीदारांच्या मिळकतीच्या नळजोडणी तोडण्यात येत आहेत. थकबाकी भरल्यानंतरच नळजोडण्या पूर्ववत् केल्या जातील. त्यामुळे थकबाकी भरण्याचे आवाहन महापालिकेकडून केले आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून २ सहस्र ७२७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी थकबाकीदारांच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. २ डिसेंबरपासून थकीत मिळकतकर वसुलीसाठी ५ पथके सिद्ध केली आहेत. त्यांच्याकडून थकबाकीदारांच्या घरासमोर वाजंत्री (बँड) वादन केले जात आहे. थकीत असलेल्या निवासी, व्यावसायिक मिळकतींना प्रतिदिन भेट देऊन जप्तीची कारवाई केली जात आहे. यातून आतापर्यंत ७१ कोटी ४१ लाख ८५ सहस्र ३९३ रुपयांचा मिळकतकर जमा झाला.
संपादकीय भूमिकामिळकतकर १० सहस्र कोटी रुपये एवढा थकीत होईपर्यंत प्रशासनाचे अधिकारी झोपले होते का ? |