३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पार्ट्यांमधून हणजूण-वागातोर येथे ध्वनीप्रदूषण

म्हापसा, २ जानेवारी (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हणजूण-वागातोर येथे पार्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण करून कायद्याला वाकुल्या दाखवण्यात आल्या. विशेष म्हणजे वागतोर येथील समुद्रकिनार्‍यावर ‘इको वामोस’ या ठिकाणी झालेल्या ‘सर्कस एक्स नमस क्रे एक्स्पीरियन्सीस २०२४/ एन्व्हा २०२५’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी ध्वनीप्रदूषण झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रसन्नता आहे. या ठिकाणी कार्यक्रमाला अनुमती नसतांनाही रात्रभर आणि दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवून ध्वनीप्रदूषण करण्यात आले.
हणजूण पंचायतीचे सरपंच लक्ष्मीकांत चिमूलकर म्हणाले, ‘‘आम्ही ध्वनीप्रदूषणाविषयी अनेक वेळा तक्रारी करूनही शासनाने कारवाई केली नाही. कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्थानिक पंचायतीच्या निर्णयाकडे कानाडोळा केला.’’  हणजूण-वागातोर येथील नागरिकांच्या मते या किनारपट्टीत अनेक पार्ट्यांमधून ध्वनिप्रदूषण करण्यात आले आणि हा प्रकार अनेक दिवस चालू आहे. अनेकांनी या काळात घर सोडून अन्यत्र रहायला जाणे पसंत केले. पोलिसांनी ध्वनीप्रदूषणासंबंधी अनेक तक्रारी आल्याचे मान्य केले; मात्र त्यांच्याकडे कारवाईसाठी मनुष्यबळ अल्प असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांना त्रस्त करून पर्यटन क्षेत्र बहरणार नाही, तर स्थानिक आणि पर्यटक यांचा सन्मान करून योग्य पर्यटन धोरण राबवावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासनातील अनेकांचे आयोजकांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे ध्वनीप्रदूषणावर कारवाई होत नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !