‘डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील ‘संगीत अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे पू. किरण फाटक यांचे १० ते १३.१.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य होते. त्यांच्या गायनातून लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये थोडक्यात पुढे दिली आहेत.
१. पू. किरण फाटक यांच्यात ६० टक्के कृष्णतत्त्व कार्यरत असणे
‘जानेवारी २०२० मध्ये पू. किरण फाटक संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी त्यांच्यात विशिष्ट देवतेचे तत्त्व जाणवायचे नाही. जानेवारी २०२३ मध्ये माझी त्यांच्याशी भेट झाल्यावर ‘त्यांच्यात कलियुगात एखाद्या जिवात येऊ शकणार्या श्रीकृष्ण तत्त्वापैकी (कलियुगात एखाद्या जिवात अधिकाधिक ५ टक्के देवतातत्त्व येते) ६० टक्के श्रीकृष्णतत्त्व (म्हणजे ३ टक्के श्रीकृष्णतत्त्व) कार्यरत आहे’, असे मला जाणवले.
काळानुसार कार्य करण्याकरिता पू. किरण फाटक यांच्यातील कृष्णतत्त्व कार्यरत झालेले असणे : पू. किरण फाटक यांची श्री स्वामी समर्थांवर निस्सीम भक्ती आहे. ‘आपली संगीत आणि आध्यात्मिक साधना ही स्वामींच्या कृपाशीर्वादाने होत आहे’, हाच पू. फाटककाका यांचा भाव आहे. ‘पू. काकांमध्ये भक्ती, ज्ञान आणि कर्म अशा तीनही योगांचा संगम आहे’, असे जाणवते. पू. काकांची श्री स्वामी समर्थांवर आणि नामस्मरणावर नितांत श्रद्धा आहे. या माध्यमातून त्यांची भक्तीयोगाची साधना चालू आहे. त्याचबरोबर पू. काकांना अध्यात्मातील विविध काव्येही स्फुरत आहेत. ही ज्ञानरूपी काव्ये, तसेच ‘संगीत’ हा विषय यांवर पू. काकांचे आतापर्यंत अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. हल्लीच त्यांनी गीतेच्या १८ अध्यायांवर आधारीत ‘काव्यात्मक भगवद्गीता’ हा ग्रंथ भावार्थासहीत लिहिला आहे. यातून त्यांची ज्ञानयोगाची साधना लक्षात येते.
पू. काकांच्या या एकूण साधनेबाबत जाणवलेल्या योगमार्गांचा अभ्यास केल्यावर, तसेच ‘गीतेवरील काव्य स्फुरणे’, हा भाग लक्षात घेता ‘काळानुसार कार्य करण्याकरिता त्यांच्यातील कृष्णतत्त्व कार्यरत झाले आहे’, असे जाणवले. ‘हे दैवी कार्य त्यांच्या हातून भगवान श्रीकृष्णच करून घेत आहे’, असे लक्षात आले.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनाही पू. फाटककाकांमध्ये श्रीकृष्णतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाल्याचे सूक्ष्मातून जाणवत असल्याचे सांगितले.
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.१.२०२३)
२. श्रीकृष्णाच्या ‘आकर्षण, आनंदत्व, ज्ञान आणि ‘योगः कर्मसु कौशलम् !’ या तत्त्वांची अनुभूती देणारे पू. किरण फाटक !
पू. किरण फाटक यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्याशी बोलण्याची, त्यांना पहात रहाण्याची, त्यांच्या जवळ जाण्याची आणि त्यांचे गाणे ऐकण्याची ओढ निर्माण होते. पू. फाटक मायेतील काही विषयांच्या संदर्भात सांगत असतांनाही मला आनंद जाणवतो. त्यांना एखादा प्रश्न विचारल्यावर ते अचूक विश्लेषण करून उत्तर देतात. याच प्रकारे त्यांचे प्रत्येक कर्म करतांना ते परिपूर्ण होण्याकडे लक्ष आणि प्रयत्न असतात. ‘(आ)कर्षणम् करोति इति ।, म्हणजे आकर्षित करणारा तो कृष्ण’ (ग्रंथातून पडताळले.) या व्याख्येप्रमाणे पू. फाटक यांच्यातील कार्यरत श्रीकृष्णतत्त्वामुळे सगळे जण त्यांच्याकडे आकर्षिले जातात. त्यांच्यातील श्रीकृष्णतत्त्वामुळे ‘आनंद, ज्ञान आणि ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०) म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे’,) यांनी युक्त, असे त्यांचे सहज आचरण असते’, असे लक्षात आले.
३. पू. किरण फाटक ज्ञानयोगी असूनही त्यांची चैतन्यातून आनंदाच्या टप्प्याकडे वाटचाल होऊन सहजयोगी होणे
अधिकतर ज्ञानयोगी स्वत:च्या कोषात रहात असून ज्ञानोपासनेत अडकत असल्याने ते चैतन्याच्या स्तरापर्यंत मर्यादित रहातात. पू. फाटक यांचा मूळ योगमार्ग ज्ञानयोगाचा असून त्यांनी त्याला ‘कर्म आणि भक्ती’ यांची जोड दिली आहे. त्यांच्यातील तिन्ही योगमार्गांच्या एकत्रिकरणामुळे एप्रिल २०२० मध्ये त्यांचे संतपद घोषित झाल्यावर चैतन्याचा स्तरावर असणारे पू. फाटक यांची आनंदाच्या दिशेने म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे वाटचाल होत आहे. याच प्रकारे तिन्ही योगमार्गांच्या एकत्रिकरणामुळे ते सहजयोगी झाल्याने मायेत राहूनही अध्यात्माचे आचरण करत आहेत.
४. ज्ञानमय प्रज्ञा आणि कर्म, भक्ती अन् ज्ञान यांच्या संगमातून समष्टीसाठी काव्यमय श्रीमद्भगवद्गीतेची निर्मिती करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने पू. फाटक यांचे संतपद घोषित झाले. पू. फाटक यांची समष्टी संतपदाकडे वाटचाल होत आहे. ज्ञानयोगाच्या साधनेमुळे पू. फाटक यांच्यात ऋषी-मूनींमधील ज्ञानमय प्रज्ञा निर्माण झाली आहे. ज्ञानमय प्रज्ञा आणि कर्म, भक्ती अन् ज्ञान यांच्या संगमातून त्यांनी समष्टीला समजण्यासाठी अशा काव्यमय श्रीमद्भगवद्गीतेची निर्मिती केली आहे.
५. गायनरूपी कर्मातून इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांसह ज्ञानशक्तीची अनुभूती देणे
पू. फाटक यांची आगळीवेगळी वैशिष्ट्ये, म्हणजे गायनातून ज्ञानशक्तीची अनुभूती देणे. केवळ साधना असलेले गायक आध्यात्मिक अनुभूती देऊ शकतात. त्यापैकी अधिकतर गायकांचे गायन इच्छाशक्तीच्या स्तरावर असते. यामुळे श्रोत्यांच्या मनात चांगल्या संवेदना निर्माण होतात. फार अल्प गायकांचे गायन क्रियाशक्तीच्या स्तरावर असते. त्यामुळे ऐकणार्या श्रोत्यांना आध्यात्मिक अनुभूती येतात आणि त्यांच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात. अत्यल्प गायक असे आहेत की, ज्यांच्या गायनातून ज्ञानशक्तीची अनुभूती येऊन जिवाच्या मनावर सात्त्विकतेचे संस्कार होतात. अशा अत्यल्प गायकांपैकी एक म्हणजे पू. किरण फाटक ! पू. फाटक यांचे गायन ज्ञानशक्तीशी निगडित असल्याने आकाशतत्त्व आणि निर्गुणतत्त्व यांची सहजतेने अनुभूती येते.
६. शिवात्मा दशेत आत्मानंद अनुभवत ‘प्रभुत्व’ गायन करणारे पू. किरण फाटक !
पू. फाटक यांचे आणखी एक वैशिष्ट्य, म्हणजे ते आत्मानंद अनुभवत गायन करतात. गायनाचा प्रकार काहीही असला, तरी त्यांची आत्मानंदाची अवस्था अशी असते की, त्या गायनातील प्रकार किंवा काळ अशा कोणत्याही घटकाचा त्यांच्या आनंदाच्या स्थितीवर परिणाम होत नाही. गायनाचा कोणताही प्रकार असला, तरी पू. फाटक यांच्याकडून आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होतात. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘गायनाचा प्रकार म्हणजे ‘स्थळ’, तर रागाचा विशिष्ट समय म्हणजे ‘काळ.’ या दोन्हींच्या पलीकडे जाणे, म्हणजे निर्गुणाकडे जाणे. अशा प्रकारे सर्व बंधने आणि काळ यांच्या पलीकडे असलेल्या गायनाला ‘प्रभुत्व गायन’ असे म्हणतात. पू. फाटक गायन करत आत्मानंद अनुभवत निर्गुणाच्या स्थितीत जातात. त्यामुळे त्यांचे गायन हे ‘प्रभुत्व गायन’ होते.
७. गायन करतांना देहबुद्धीचे विस्मरण झाल्याने पू. किरण फाटक यांच्या हातांच्या हालचालींतूनही आनंदाचे प्रक्षेपण होणे
पू. फाटक गायन करतांना त्यांच्या हातांच्या पुष्कळ हालचाली होतात. अन्य काही गायकांच्या हातांच्या हालचालींकडे बघितल्यावर त्रासदायक वाटते. याउलट पू. फाटक यांच्या हातांच्या हालचालींकडे बघितल्यावर त्यातून आनंदाचे प्रक्षेपण होते. या संदर्भात लक्षात आले, ‘अन्य गायकांच्या हालचालींतून त्यांच्यातील अहंचे प्रकटीकरण होते. यामुळे त्यांच्याकडे बघू नये’, असे वाटते. गायन करतांना पू. फाटक यांना देहबुद्धीचे विस्मरण होते. ज्या प्रकारे भावाच्या उच्च अवस्थेत अष्टसात्त्विक भाव देहाच्या माध्यमातून प्रगट होतात, त्या प्रकारे गायनाच्या माध्यमातून पू. फाटक अनुभवत असलेला आनंद त्यांच्या देहबोलीतून प्रगट होतो. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे बघितल्यावरही आनंद होतो.’
८. मनाच्या पारदर्शक स्थितीमुळे प्रभुत्व गायन करणे आणि श्रोत्यांना आध्यात्मिक अनुभूती येणे
अन्य कलाकार गात असतांना सूक्ष्म स्तरावरील अनुभूती घेण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतात आणि काही वेळानंतर मला त्या अनुभूतीचे विश्लेषण ग्रहण करता येते; मात्र पू. फाटक यांचे गायन चालू असतांना मला अनुभूती घेण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागत नाहीत अन् अनुभूतीचे विश्लेषण सहजतेने ग्रहण करता येते. या संदर्भात मला जाणवले, ‘गायन करतांना पू. फाटक यांच्या मनाची पारदर्शक आणि वर्तमानकाळाला अनुकूल अशी स्थिती असते. त्यांच्या मनाच्या पारदर्शक स्थितीमुळे श्रोत्यांना आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी प्रयत्न न करताही सहजतेने अनुभूती येते.’
९. एकाच वेळी ‘कर्म, भक्ती आणि ज्ञान’ या तिन्ही टप्प्यांवर राहून कार्य करणे
पू. फाटक यांचे अजून एक वैशिष्ट्य, म्हणजे ते कोणतेही कर्म करतांना एकाच वेळी कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही टप्प्यांवर असतात. यामुळे त्यांचे प्रत्येक कर्म स्थुलातून परिपूर्ण, भावयुक्त आणि शास्त्रशुद्ध असे असते. राग मालकंसवर आधारित एका बंदिशची शब्दरचना तामसिक होती. त्यांनी या बंदिशीचे गायन करण्यापूर्वी ‘ती बंदिश कशाप्रकारे नकारात्मक आहे’, याचे विश्लेषण केले आणि नंतर परिपूर्णपणे त्या बंदिशीचे गायन केले. त्यांना त्या बंदिशीविषयी ज्ञान असतांनाही त्यांनी समष्टीसाठी ती कृती परिपूर्ण केली.
१०. कृतज्ञता
श्रीकृष्णाचे तत्त्व असलेले आणि सर्व स्तरांवर समष्टीसाठी आदर्श असणारे पू. फाटक यांच्या समवेत राहून त्यांच्या प्रत्यक्ष आचरणातून शिकायला मिळाले, त्याबद्दल पू. फाटक आणि अशा संतरत्नांचा शोध घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१.२०२३, दुपारी ४.३६)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |