‘ग्रंथविक्री मोहिमे’च्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे शाळा आणि वाचनालये या ठिकाणी वितरण करतांना समाजातून लाभलेला प्रतिसाद अन् शिकायला मिळालेली सूत्रे
‘एका सत्संगात ‘शाळा आणि वाचनालये या ठिकाणी ग्रंथविक्रीची मोहीम घेणे’, याविषयी सूत्र घेण्यात आले होते. ते ऐकल्यानंतर ‘संतांच्या संकल्पाने आपणही असे प्रयत्न करूया’, अशी प्रेरणा मला मिळाली. अत्यंत सकारात्मक राहून आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करायचे ठरवले. आसपासच्या परिसरातील प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये, वाचनालये आणि महाविद्यालये यांची सूची सिद्ध केली अन् त्यांच्याशी संबंधित अशा परिचित व्यक्तींना संपर्क करून त्यांना या धर्मकार्यात सहभागी होण्याविषयी सांगितले. या वेळी संतांच्या संकल्पाचा लाभ होऊन प्रतिदिन १० – १५ मोठे ग्रंथ वितरित होत होते. या पूर्ण मोहिमेच्या वेळी आलेले अनुभव पुढे दिले आहेत.
१. संपर्काला जाण्यापूर्वी नामजपादी उपाय केल्यामुळे मन सकारात्मक राहून प्रयत्न होऊ लागणे आणि सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने उत्साह वाढत जाणे
ग्रंथविक्रीसाठी संपर्क करायला जाण्यापूर्वी मी नामजपादी उपाय करून जात असे. त्यामुळे घरातून बाहेर पडतांना माझे मन अत्यंत सकारात्मक असायचे. ग्रंथविक्री झाली नाही, तरी ‘ग्रंथ समाजापर्यंत घेऊन जाणे आणि त्यांचे महत्त्व समाजाला पटवून देणे, यांमुळे ‘माझी साधना होणार आहे’, हा एकच विचार माझ्या मनात असायचा. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले आणि सगळीकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहिल्यावर माझा उत्साह वाढू लागला.
२. ‘सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळू शकते’, हे लक्षात येणे
सनातनने प्रकाशित केलेल्या ‘सात्त्विक देवनागरी अक्षर आणि अंक लिहिण्याची पद्धत’, ‘अग्नीशमन प्रशिक्षण’, तसेच ‘बालसंस्कार मालिकेतील ग्रंथ’ या ग्रंथांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळू शकते अन् सर्वत्रच्या शाळांमध्ये यासाठी प्रयत्न करू शकतो’, हे माझ्या लक्षात आले. देवगड केंद्रातील एकूण ३ वाचनालये, जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक आणि ५ माध्यमिक शाळा यांना आम्ही भेटी दिल्या. त्या वेळी १५ दिवसांच्या या मोहिमेच्या अंतर्गत १४३ मोठ्या ग्रंथांची विक्री झाली.
३. ग्रंथविक्री करतांना आलेले अनुभव
अ. अनेक शाळांमध्ये असे लक्षात आले की, त्यांना सर्वच ग्रंथ अतिशय आवडायचे; परंतु ‘पुढे काही अडचण येऊ नये’, यासाठी ते हिंदु धर्माविषयीचे ग्रंथ विकत घ्यायचे नाहीत.
आ. ‘बालसंस्कार मालिकेतील ग्रंथ’ पाहिल्यानंतर काही शिक्षकांनी ‘आमच्या शिक्षक-पालक बैठकीच्या वेळी आम्ही तुम्हाला बोलावतो. तेव्हा तुम्ही हे ग्रंथ दाखवा. हे मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत’, असे सांगितले.
इ. ‘सात्त्विक देवनागरी अक्षर आणि अंक लिहिण्याची पद्धत’ या ग्रंथाची ‘शाळेच्या स्तरावर मागणी देण्यास सहकार्य करू’, असेही शिक्षकांनी सांगितले.
ई. एका शाळेतील शिक्षकांनी ग्रंथ पहाण्यासाठी विद्यार्थ्यांनाही बोलावले आणि त्यांची ग्रंथांसाठी मागणी घेऊन त्यांना पैसे आणण्यास सांगितले.
उ. शिक्षकांना धर्मप्रेमींसाठी घेण्यात येणार्या भाववृद्धीसाठी सत्संगाविषयी सांगितल्यानंतर ते सर्व जण सकारात्मक झाले.
४. शाळा आणि ग्रंथालये यांना भेटी देण्याचे नियोजन करतांना जिथे ज्यांची ओळख आहे, त्यांचे नियोजन करणे
शाळा अन् ग्रंथालये यांना भेटी देण्याचे नियोजन करतांना जिथे ज्यांची ओळख आहे, त्यांचे नियोजन केले. त्याचाही ग्रंथवितरण वाढीसाठी लाभ झाला.
अ. देवगडमधील एका वाचनालयाला भेट देण्यापूर्वी त्या वाचनालयाचे अध्यक्ष असलेल्या माजी आमदारांना संपर्क केल्यानंतर त्यांनी ग्रंथ विकत घेण्याचे आश्वासन दिले.
आ. एका शाळेला तेथील ग्रामपंचायतीने ग्रंथांच्या खरेदीसाठी ५,००० रुपये अनुदान दिले होते. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही या अगोदर आला असता, तर आम्ही ग्रंथ खरेदी केले असते. पुढच्या वर्षी या. आम्ही नक्की ग्रंथ घेतो.’’ आम्ही अगोदरच त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही. आमच्यासाठी हे सर्व नवीनच होते. त्यामुळे ‘ग्रामपंचायती शाळांना ग्रंथ खरेदीसाठी अनुदान देतात’, हे लक्षात आले.
५. ग्रंथपाल आणि मुख्याध्यापक यांच्या प्रतिक्रिया
अ. ‘सनातनच्या ग्रंथांमधून सर्वच गोष्टींचे ‘का आणि कसे ?’ सोप्या भाषेत सांगितलेले असल्याने मी माझ्या मुलाला कोणताही प्रश्न असल्यास अगोदर ‘सनातनचे ग्रंथ वाच. त्यात तुला सर्व माहिती मिळेल’, असे सांगते.’ – सौ. स्वाती रानडे, ग्रंथपाल, शेतकरी वाचनालय, पुरळ-हुर्शी, देवगड.
आ. ‘हे ग्रंथ अतिशय उपयुक्त आहेत.’ – श्री. मधुसूदन काळे, मुख्याध्यापक, कसबावाघोटण मराठी शाळा, देवगड.
इ. ‘हे ग्रंथ तुम्ही आमच्या शिक्षक-पालक बैठकीच्या वेळी घेऊन या आणि त्यांचे महत्त्व सांगा. हे ग्रंथ अतिशय उपयुक्त असून पालक हे ग्रंथ नक्की घेतील. आम्ही त्या वेळी तुम्हाला निरोप देतो.’ – मुख्याध्यापक, मुळबांध मराठी शाळा, देवगड.
ई. ‘सात्त्विक देवनागरी अक्षर आणि अंक लिहिण्याची पद्धत’ या ग्र्रंथांसाठी तुम्ही शालेय स्तरावर जूून मासात मागणी घेऊ शकता. आम्ही सहकार्य करू.’ – मुख्याध्यापक, जिल्हा परिषद गिर्ये मराठी शाळा
६. अन्य सूत्रे
अ. प्राथमिक शाळेतील शिक्षकांची अधून-मधून संमेलने होत असतात. त्या वेळी शिक्षकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन घेऊ शकतो’, असे लक्षात आले आणि त्याप्रमाणे प्रयत्न केले.
आ. ‘शाळांमध्ये, तसेच घरोघरी संपर्काला गेल्यावर ग्रंथ व्यवस्थित पहाण्यासाठी जिज्ञासूंना पुरेसा वेळ देता येतो. त्यांना ग्रंथांची माहिती सांगता येते आणि याद्वारे ग्रंथांचे वितरण चांगल्या प्रकारे होते’, हे लक्षात आले.
इ. ग्रंथविक्रीची मोहीम विलंबाने चालू केली. त्यामुळे अनेक शाळांमधील अनुदान व्यय (खर्च) झाले होते, तरीही शिक्षकांनी त्यांना आवडल्यामुळे ग्रंथ खरेदी केले.
७. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर चालू असलेल्या ग्रंथविक्री मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणावर ग्रंथविक्री होणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मे २०१७ मध्ये देवगड तालुक्यातील ‘पडेल’ या उपकेंद्रात सलग १५ दिवस ग्रंथविक्रीची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत उपकेंद्रातील साधक सहभागी होते. त्या वेळी ग्रंथप्रदर्शन आणि घरोघरी प्रसार या माध्यमांतून १०० ते १५० मोठे ग्रंथ विक्री झाले होते. त्यातून प्रेरणा मिळून साधकांनी गेले वर्षभर घरोघरी ग्रंथविक्री, ग्रंथ प्रदर्शन यांद्वारे ही मोहीम चालूच ठेवली. त्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात ग्रंथविक्री झाली आहे.
गुरुदेवांनी सनातनचे ग्रंथरूपी चैतन्य समाजात घेऊन जाण्याची संधी आम्हा सर्व साधकांना दिली, त्यासाठी कृतज्ञताभावाने हे सेवारूपी पुष्प श्री गुरुचरणी अर्पण करते. ‘हे गुरुदेवा, आमच्याकडून अधिकाधिक गुरुसेवा होण्यासाठी आम्हाला शक्ती, बुद्धी आणि कृपाशीर्वाद लाभू देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर, पडेल, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. (६.४.२०१८)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |