पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – केंद्रशासनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी गोवा शासन विजेवर चालणार्या वाहनांना प्रोत्साहन देणार आहे, अशी माहिती राज्याचे वीज आणि पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘विजेवर चालणार्या वाहनांना चालना देण्यासाठी शासन ‘क्लिन मोबिलिटी’ योजना राबवणार आहे. ही योजना राज्यात विक्री होणार असलेल्या पहिल्या १० सहस्र दुचाकींना लागू होणार आहे. यामुळे ‘कार्बन डायओक्साईड’चे ५ सहस्र टन उत्सर्जन घटणार आहे. यामुळे राज्यातील प्रदूषणकारी १० टक्के वाहने घटणार आहेत. ही योजना केंद्राची ‘कन्व्हर्जन्स अॅनर्जी सर्व्हीसीस’ ही संस्था राबवणार आहे. ही दुचाकी एकदा पूर्ण ‘चार्ज’ केल्यास ३ ते ४ घंटे सुमारे १०० किमी अंतर पार करू शकते.’’
ऑक्टोबर मासात काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित होणार !
चालू वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मासात काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची चाचणी ऑगस्ट मासात घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. प्रकल्पाच्या भूमीची पहाणी केल्यानंतर मंत्री काब्राल यांनी ही माहिती दिली. मंत्री काब्राल म्हणाले, ‘‘या प्रकल्पामुळे सांगे, केपे, धारबांदोडा आणि काणकोण तालुक्यांमधील कचर्यांवर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे आणि कचर्यावर प्रक्रिया करून त्यातून विजेची निर्मिती केली जाणार आहे.’’