मिरज, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने युवक-युवतींकडून होणारे अपप्रकार होऊ नये म्हणून बजरंग दलाने १४ फेब्रुवारी या दिवशी मिरज शहर, तसेच ग्रामीण भाग आणि दंडोबा डोंगर येथे पहारा पथके कार्यरत ठेवली होती. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यकर्ते सातत्याने पहारा देत असल्याने कोणताही अनुचित प्रकार दिसून आला नाही. पोलिसांनीही यंदा शहर परिसर, दंडोबा डोंगर येथे दामिनी पथके सिद्ध ठेवली होती.
या संदर्भात अधिक माहिती देतांना बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डे साजरा न होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. गेली २ वर्षे आम्ही अनेक युवक-युवती यांचे प्रबोधन करून त्यांना जाणीव करून देऊन घरी परत पाठवले होते. यंदाही आम्ही पहारा दिला. गणेश तलाव परिसरात काही युवती आल्या होत्या; मात्र आमच्या कार्यकर्त्यांना पाहून त्या परत गेल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथेही दहावीच्या काही विद्यार्थिनी शिकवणी संपवून आल्या होत्या. त्यांची चौकशी करून आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हटकल्यावर त्या घरी परत गेल्या.
या मोहिमेत बजरंग दलाचे कार्यकर्ते कौस्तुभ गुरव, प्रसाद कोरे, ओंकार वाघमारे, सागर जाधव, निकेष आवळे, दया वाघमारे मिरज शहर परिसरात, तर स्वप्नील मालकर, सागर सावंत, रोहित हराले, तेजस कदम यांचे पथक मिरज ग्रामीण परिसर आणि दंडोबा डोंगर येथे कार्यरत होते.