सतत अनुसंधानात राहून प्रत्येक सेवा केल्याने कु. चेतना चंद्रकांत चव्हाण यांना देवाचे मिळालेले साहाय्य अन् स्वतःत जाणवलेले पालट

‘आरंभी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा माझी बहीण करत होती. तिची प्रकृती बरी नसल्यामुळे ती सेवा मी करू लागले. माझा स्वभाव एकलकोंडा असल्याने मला कुणाशी बोलायला आवडायचे नाही. वाचकांना दैनिक देतांना मी त्यांच्याशी न बोलता केवळ त्यांना दैनिक द्यायचे आणि यायचे. मी दैनिकाच्या वितरणाची सेवा पाट्याटाकूपणे करत असे. माझ्यात ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू असल्यामुळे ‘ते काय म्हणतील ? तसेच मी बोलतांना चुकले, तर..’ या विचाराने मी बोलणे टाळायचे.

१. प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याने वाचकांशी जवळीक निर्माण होणे

एक वाचक नियमित किरकोळ दैनिक घेत असत आणि त्याचे प्रतिदिन पैसे द्यायचे. पैसे देतांना ते वरून हातात पैसे टाकायचे. त्या वेळी माझ्या मनात त्यांच्याविषयी ‘हे असे का करतात ? हे मला आवडत नाही’, असे विचार यायचे. हे सर्व विचार मी घरी येऊन बहिणीला सांगितले. त्यावर तिने मला सांगितले, ‘‘आपण प्रेमाने बोलायचे आणि जवळीक साधायची.’’ तिने सांगितल्याप्रमाणे मी प्रयत्न केले. त्यानंतर ते वाचक स्वतःहून माझ्याशी बोलायला लागले.

कु. चेतना चव्हाण

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूवर मात करता येणे अन् मनातील भीती न्यून होऊन वाचकांशी मनमोकळेपणे बोलणे

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेद्वारे माझ्या लक्षात आले की, मी प्रतिमा जोपासत असल्यामुळे मला वाचकांशी मोकळेपणाने बोलता येत नव्हते आणि जवळीक साधता येत नव्हती. त्यामुळे दैनिक वितरण आणि दैनिकाची वसुली करतांना माझा संघर्ष व्हायचा. यासाठी बहिणीचे साहाय्य घेऊन मी प्रयत्न करू लागले. दैनिकातील सूत्रे वाचून त्या सूत्रांच्या अनुषंगाने मी त्यांच्याशी संवाद साधायला आरंभ केला. असे प्रयत्न केल्याने माझ्या मनातील भीती न्यून होऊन मला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येऊ लागले. वाचकही माझ्याशी मनमोकळेपणाने बोलून त्यांच्या अडचणीही सांगू लागले. त्यांच्या अडचणींवर मला त्यांना आध्यात्मिक उपाय सांगता येऊ लागले. त्या उपायांनी त्यांना लाभ झाला. यामुळे त्यांच्याशी अधिक जवळीक झाली. त्या वाचकांना दैनिक, अर्पण आणि विज्ञापन यांचे महत्त्व सांगता आले.

३. गुरुपौर्णिमेनिमित्त विज्ञापने गोळा करण्याची सेवा शिकणे आणि सेवा करतांना देवाचे साहाय्य घेणे

माझ्याकडे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विज्ञापन घ्यायची सेवा होती. मी ही सेवा कधीही केलेली नव्हती. ‘ती कशी करायची ? त्यांना काय सांगायचे ? त्यांच्याशी काय बोलायचे ?’, हे मला ज्ञात नव्हते. याविषयी बहिणीने मला ‘अर्पणाचे महत्त्व, सकारात्मक रहाणे आणि देवाला सांगणे’ यांविषयी सांगितले. ‘देवा, पहिल्यांदा सेवेला जात आहे. तू माझ्या समवेत रहा. ‘नेमकेपणाने काय सांगायचे ?’, ते तू सांग. मला साहाय्य कर’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी कृती केली. मी देवाचे साहाय्य मागू लागले. असे प्रयत्न केल्याने मला विज्ञापन घेण्याची सेवा जमू लागली.

४. दैनिक वितरणाची सेवा करतांना विचारून घेण्याची वृत्ती वाढणे आणि प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व लक्षात येणे

दैनिकाच्या रकमेची वसुली करतांना रविवारी वसुलीला विलंब होत असे. ‘त्याविषयी काय करू शकतो ?’, असे ताईला विचारल्यावर ‘आपण त्यांना वार्षिक वर्गणीदार बनवू शकतो’, असे तिने सांगितले. ‘त्यांना वर्गणीदार बनवतांना काय सांगायचे ?’, हे तिला विचारल्यामुळे माझ्यात विचारून घेण्याची वृत्ती वाढली. रविवारच्या किरकोळ वाचकांना वर्गणीदार बनवतांना मी देवाचे साहाय्य घेतले. वाचकांकडे गेल्यावर त्यांना त्याचे महत्त्व सांगितले आणि रविवारचे १७ वार्षिक वर्गणीदार झाले. ते वाचक सात्त्विक उत्पादने वापरतात. ते अर्पण द्यायला लागले. प्रक्रिया राबवली नसती, तर माझ्यात असे पालट झाले नसते.

५. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितल्याप्रमाणे देवाशी अनुसंधान वाढवल्याने ताण न्यून होणे

मी कामाला जाते. माझी कामाची वेळ सकाळी ८.३० ते ११, दुपारी १ ते ४ आणि सायंकाळी ७ ते रात्री १०.३० अशी आहे. मला सकाळी ११ ते दुपारी १ हा वेळ मिळतो. त्या वेळेत जेवण बनवणे, दैनिक वितरण अशी सेवा करावी लागायची. ‘हे सर्व अल्प कालावधीत कसे काय हाताळायचे ?’, असा विचार मनात येऊन माझी चिडचिड व्हायची आणि मला ताणही यायचा. येणार्‍या अडचणींविषयी मी सद्गुरु सत्यवानदादांशी बोलले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘अनुसंधान वाढव.’’ ‘अनुसंधान कसे वाढवायचे ?’, हे मला कळत नसे. प्रत्येक सेवेत मी देवाला सांगत असे की, तू मला साहाय्य कर. सकाळी उठतांना मी श्रीकृष्णाला सांगत असे, ‘मला समष्टी सेवेला जाता येत नाही. मी काय सेवा करू ? मी पुष्कळ मागे आहे’ अन् मला खंत वाटे.

वडील काही बोलले की, मला राग येऊन लगेच प्रतिक्रिया यायची. त्यानंतर मी देवाचे साहाय्य घेतले. श्रीकृष्णाला मी सतत सांगायचे, ‘तू मला साहाय्य कर आणि मला संयम ठेवायला शिकव.’ अनुसंधान वाढवल्यामुळे वडील काही बोलले, तरी मनात प्रतिक्रिया येत नसत. ‘ईश्‍वर माझी परीक्षा बघत आहे. माझा संयम वाढवण्यासाठी हे सगळे करत आहे’, असा भाव मी ठेवू लागले. प्रतिदिन झोपतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहून झोपत असे. त्यामुळे सकाळी उठल्यावर मला हलके जाणवायचे.

६. जेव्हा दैनिकाचे विशेषांक अधिक असतात, तेव्हा ‘ते कुणाला देऊ ?’, असे देवाला विचारल्यावर आपोआप ज्या गावांमध्ये पूर्वी दैनिक वितरणाला जायचो, तेच वाचक दृष्टीसमोर यायचे आणि अल्प कालावधीत दैनिक वितरण होत असे.

७. अनुसंधान वाढल्यामुळे एकाच वेळी अनेक सेवांचे नियोजन करता येणे

आमच्याकडे सात्त्विक उत्पादनांचा साठा आहे. मला त्या सेवेच्या संदर्भात काही येत नसे आणि मी शिकूनही घेतले नव्हते. मी विचार करायचे, ‘ताईची सेवा आहे, ती करील. मी करणार नाही.’ माझी संकुचित वृत्ती असल्याने माझ्यात व्यापकत्व नव्हते; पण अनुसंधान वाढवल्यामुळे ‘आलेला साहित्याचा साठा चलनाप्रमाणे मोजून घेणे, मागणी घेणे, साठा काढणे, चलन बनवणे’ या सेवा शिकले आणि अल्प वेळेत मला सेवा करता येऊ लागली. ‘दैनिकाचे देयक बनवणे, दैनिक वितरण, उत्पादन वितरण, जेवण बनवणे, भांडी घासणे आणि कपडे धुणे’ या सेवांचे नियोजन करता येऊ लागले.

८. मी ‘गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी पावती पुस्तक घेऊन प्रतिदिन दोन जणांकडे संपर्काला जायचे’, असे ठरवले. त्याप्रमाणे अल्प कालावधीत दोन पावती पुस्तके पूर्ण झाली. काही वेळा सेवा करतांना चालढकलपणा करण्याचा विचार यायचा; पण अनुसंधान वाढवल्यामुळे मी तत्परतेने सेवा करू लागले. ही सेवा करतांना मला आनंद मिळायला लागला. मी आनंदी आहे. हे केवळ गुरुदेवांमुळे शक्य झाले.

९. मी ज्या ठिकाणी कामाला जाते, तेथे माझा स्वीकारण्याचा भाग नव्हता. प्रतिमा जोपासल्यामुळे माझा पुष्कळ संघर्ष व्हायचा. सुटी हवी असल्यास मला अधिकाधिक नामजप आणि प्रार्थना करावी लागायची. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला मला लगेचच सुटी मिळाली.

१०. ‘जपमाळ वितरण कर’, असे बहिणीने सांगितले, तेव्हा ‘कुणाला वितरण करू ?’, असा विचार येत असतांनाच देवानेच वितरणाचा विचार माझ्या मनात घातला. देवाला म्हटले, ‘तूच साहाय्य कर.’ त्यानंतर दैनिक वितरणाची सेवा करतांना समवेत नामजपाचे महत्त्व सांगून ८ जपमाळा वितरित झाल्या.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नवीन जिज्ञासूंना नामाचे महत्त्व सांगण्याची संधी दिली; म्हणून गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. चेतना चंद्रकांत चव्हाण, देवगड, सिंधुदुर्ग.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक