रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
मालवण – तालुक्यातील ओझर-कांदळगाव-मसुरे हा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले असून वारंवार अपघात घडत आहेत. ‘रस्त्याची दुरुस्ती करावी’, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करत संतप्त झालेल्या कांदळगाव ग्रामस्थांनी १२ फेब्रुवारीला सकाळी राणेवाडी तिठा येथे ‘रस्ताबंद’ आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. दीड घंटा चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर बांधकाम विभागाचे अधिकारी आणि आमदार वैभव नाईक यांनी ‘एका मासात रस्त्याचे काम चालू करू’, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. (यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? – संपादक)
रस्ताबंद आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नितीन दाणे आंदोलनस्थळी उपस्थित झाले. या वेळी ग्रामस्थ आक्रमक बनले. या वेळी दाणे यांनी ‘या रस्त्यासाठी वर्षभरापूर्वी २ कोटी रुपये निधी संमत केला होता; मात्र कोरोनामुळे काम थांबले. रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव पाठवला आहे. एका मासात कामाला संमती मिळण्यासाठी प्रयत्न करू’, असे पत्र दाणे यांनी ग्रामस्थांना दिले. आमदार वैभव नाईक यांनी भ्रमणभाषवर ग्रामस्थांशी चर्चा केली आणि रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला नाही, त्यांचा ग्रामस्थांनी या वेळी निषेध केला.
आंदोलनाच्या कालावधीत आजारी व्यक्ती, शाळेत जाणारी मुले यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांची प्रवासव्यवस्था ग्रामस्थांनी केली होती. पोलीसही फौजफाट्यासह आंदोलनस्थळी उपस्थित होते.
या आंदोलनाला पंचायत समिती सदस्य सोनाली कोदे, ग्रामपंचायत सदस्य मनोज आचरेकर, युवा नेते बाबा परब, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने यांनी पाठिंबा दर्शवला. शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.