ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म स्वीकारणार्‍या दलिताला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही ! – केंद्र सरकार

‘आरक्षणाचा लाभ केवळ १० वर्षे देण्यात यावा’, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. आरक्षणाविषयी त्यांच्या सूचनांचे पालन केल्यास देशाचा नक्कीच उत्कर्ष होईल !

नवी देहली – ज्या दलित नागरिकाने ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्म स्वीकारला आहे त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यांना अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवरून निवडणूक लढता येणार नाही. याखेरीज त्यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा इतर कोणताही लाभ घेता येणार नाही, असे केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत घोषित केले.

कायदामंत्री प्रसाद म्हणाले की, राज्यघटनेच्या परिच्छेद ३ मध्ये अनुसुचित जातींविषयी म्हटले आहे की, हिंदु, शीख किंवा बौद्ध धर्मांच्या व्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. वर्ष १९५० मध्ये तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या सरकारने अनुसूचित जातींची व्याख्या स्पष्ट करतांना ‘केवळ हिंदु धर्मात आस्था असणारी व्यक्ती’ अशी केली होती. नंतर वर्ष १९५६ मध्ये या व्याख्याची व्याप्ती वाढवून हिंदु, शीख आणि बौद्ध यांचाही समावेश करुन व्याप्ती वाढवण्यात आली.