तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आंदोलन करणार्‍या लोकांना ‘कुत्रे’ म्हटले !

मारहाण करून हाकलून लावण्याचीही धमकी !

लोकशाही शासनव्यवस्थेतील हुकूमशाहीप्रमाणे राज्यकारभार करणारे तेलंगण राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ! असेच नेते स्वतःला लोकशाहीचे रक्षक समजून हिंदुत्वनिष्ठांवर टीका करत असतात, हे लक्षात घ्या !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना एका सभेच्या वेळी आंदोलन करून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना ‘कुत्रे’  संबोधले. विरोधी पक्षांनी या प्रकरणी ‘चंद्रशेखर राव यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.

 १. राज्यातील नलगोंडा जिल्ह्यातील नागार्जुन सागर येथे एका प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यासाठी चंद्रशेखर राव गेले होते. त्या वेळी ‘दलित शक्ती’ नावाच्या संघटनेचे कार्यकर्ते राव यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी ते घोषणाबाजी करत होते. त्यांच्या हातात फलकही होते. या वेळी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

२. हे पहाता चंद्रशेखर राव म्हणाले, ‘‘ते निवेदन देऊ इच्छित आहेत, ते घ्या आणि माझे भाषण शांतपणे ऐका. जर तुम्हाला भाषण ऐकायचे नसेल, तर येथून निघून जा. येथे वेडेपणा करू नका, नाहीतर शिक्षा करण्यात येईल. पोलिसांनो, यांना येथून बाहेर काढा. अन्य लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. मी अशी नाटके पुष्कळ पाहिली आहेत. मी तुमच्यासारखे पुष्कळी कुत्रे पाहिले आहेत. तुम्ही केवळ मूठभर आहात. जर आमच्याकडून प्रतिक्रिया उमटली, तर तुम्ही चिरडून जाल. तुमच्या मूर्खपणामुळे येथे काहीच अडचण होणार नाही. येथून निघून जा, नाही तर तुम्हाला चोपले जाईल.’’