शासकीय रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास अपयशी का ठरली ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. यामध्ये दोषी असणार्यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा चुका पुन्हा होणार नाहीत.
सांगली – येथील सर्व शासकीय रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास अपयशी ठरल्याचे आढळून आले आहे. या रुग्णालयात अग्नीशमन सिलेंडर वगळता आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये आवश्यक उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहे.
महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने ही पडताळणी करून त्याचा अहवाल जिल्ह्याधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही पडताळणी करण्याचे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला दिले होते. जिल्ह्यातील १७ रुग्णालयांत ही पडताळणी करण्यात आली. यात मिरज आणि सांगली शासकीय रुग्णालयांचा समावेश होता. केवळ शिराळा आणि ईश्वरपूर येथे फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत; परंतु शिराळा येथील सुविधा देखभाल दुरुस्तीअभावी सध्या बंद आहे.