अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील निलंबित !

अर्णव गोस्वामी यांना कारागृहात भ्रमणभाष पुरवल्याचे प्रकरण

अधीक्षक आंबादास पाटील

रायगड – रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी हे अलिबाग कारागृहात असतांना त्यांना व्हीआयपी दर्जाची वागणूक देऊन त्यांना भ्रमणभाष पुरवल्याच्या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना ७ फेब्रुवारी या दिवशी निलंबित करण्यात आले. पाटील यांच्या खातेनिहाय चौकशीनंतर त्यांच्यावर कारागृह महानिरीक्षकांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी यापूर्वी २ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नीतेश सारडा यांना ४ नोव्हेंबर २०२० या दिवशी मुंबई येथून अटक केली होती. अलिबाग न्यायालयाने तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अर्णवसह नीतेश आणि फिरोज यांना अलिबाग नगर परिषद शाळा क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अलिबाग जिल्हा कारागृहाचे पोलीस तैनात करण्यात आले होते.

६ नोव्हेंबर २०२० या दिवशी भ्रमणभाष पुरवल्याचे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अर्णवसह दोघांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले. अर्णव यांना भ्रमणभाष पुरवल्याच्या कारणावरून त्या वेळी कर्तव्यावर असलेले सुभेदार अनंत डेरे आणि कारागृहातील पोलीस सचिन वाडे यांच्यावर कारागृह अधीक्षक आंबादास पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली होती; मात्र त्यानंतर या दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक पाटील यांनीच भ्रमणभाष अन् इतर सुविधा पुरवल्याचा आरोप केला होता.