वाळव्याच्या बहे (जिल्हा सांगली) येथील रामलिंग बेटाजळ कृष्णा नदीच्या पात्रात दूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत्यूमुखी

वारंवार सहस्रो मासे मृत्यूमुखी पडूनही त्याविरोधात कोणतीही ठोस कृती न करणारे निष्क्रीय प्रदूषण मंडळ !

सांगली, ४ फेब्रुवारी – वाळव्याच्या बहे (जिल्हा सांगली) येथील रामलिंग बेटाजळ कृष्णा नदीच्या पात्रात ३ फेब्रुवारी या दिवशी दूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत्यूमुखी पडले. मळीमिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नदीपात्रात माशांचा खच पडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या घटनेनंतर प्रदूषण महामंडळाचे अधिकारी नवनाथ औताडे यांनी त्यांच्या पथकासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली.

गेल्या मासात कोल्हापूर जिल्ह्यातही पंचगंगा नदीत याचप्रकारे प्रदूषित पाण्यामुळे तेरवाड बंधार्‍याजवळ सहस्रो मासे मृत्यूमुखी पडले होते. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी आणि कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी यांच्या विविध भागात अशा घटना सातत्याने घडतात; मात्र प्रदूषण मंडळ केवळ नोटिसांचा फार्स बजावण्यापलीकडे काहीच ठोस कारवाई करत नाही. यामुळे नागरिक आणि पर्यावरणप्रेमी संतप्त आहेत.

सौजन्य : टी.व्ही.9 मराठी