सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना भेटण्यापासून गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले !

आंदोलन करणार्या शेतकर्यांना भेटण्यासाठी आलेले नेते

गाझीपूर (उत्तरप्रदेश) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार देहलीच्या गाझीपूर सीमेवर शेतकर्‍यांना भेटण्यासाठी पोचले असता त्यांना देहली पोलिसांनी सीमेवरच अडवले. त्यांना आंदोलनस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या खासदारांमध्ये पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू राज्यांतील अनेक खासदारांचा समावेश होता.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही येथे गडबड करायला आलो की काय ? अशा पद्धतीने प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा आणि बॅरिकेट्स लावून आम्हाला रोखण्यात आले. शेतकर्‍यांशी सरकार ज्या पद्धतीने वागत आहे, हे अतिशय दुर्देवी आहे. आम्ही संसदेत मागणी करतो की, यावर वेगळी चर्चा व्हावी; पण सरकार यासाठी सिद्ध नाही. ‘आम्ही शेतकर्‍यांशी चर्चाच करू नये’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवरही नसेल इतकी कठोर बंधन येथे घातली आहेत. आम्हाला पुढे जाऊ दिले नाही, तर आम्ही लोकसभेच्या अध्यक्षांकडे जाऊन येथील परिस्थिती समजावून सांगणार आहोत.