मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकल मुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक ! – लोकल प्रवासी संघटनांचे मत

लोकलच्या नव्या निर्बंधामुळे लोकल प्रवासी संघटना संतप्त !

मुंबई – ३ राजकीय पक्षांच्या जात्यात सामान्य प्रवासी भरडला जात असून सुस्पष्ट निर्णय घेतला जात नाही. गेले १० मास सर्वसामान्यांना प्रवास यातना सहन कराव्या लागत आहेत. मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकलमुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक आहे, असे लोकल प्रवासी संघटनांनी म्हटले आहे. लोकलच्या नव्या निर्बंधामुळे लोकल प्रवासी संघटना संतप्त झाल्या आहेत.

‘चेन्नई पॅटर्न’नुसार राज्यशासनाने सर्वांसाठी लोकल रेल्वेसेवा चालू करण्याची घोषणा केली आहे. १ फेब्रुवारी या दिवशी याची कार्यवाही न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढू आणि कल्याण-डोंबिवली, मुंबई आणि अन्य महापालिका निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवू’, असे ठाम मत रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

‘साधारणपणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी मुंबईतील कार्यालयांची वेळ आहे. वेळेचे बंधन ठेवून दिलेली मुभा म्हणजे नोकरदार वर्गाला लोकल असून नसल्यासारखी आहे. यामुळे शासनाने सामान्यांना आणखी वेठीस न धरता सर्वांसाठी सर्व वेळेत अनुमती द्यावी’, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनाचे प्रसिद्धीप्रमुख शैलेश राऊत यांनी व्यक्त केली.

लोकल वेळेचा नियम मोडल्यास शिक्षा होणार !

‘राज्यशासनाने आणि रेल्वे प्रशासन यांनी मान्य केलेली वेळ वगळता अन्य वेळेत सर्वसामान्यांनी लोकलने प्रवास करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ आणि रेल्वे कायदा यांनुसार कारवाई करण्यात येईल’, असे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले. विनागर्दीच्या वेळेत सर्वांना १ फेब्रुवारीपासून लोकलमुभा दिल्यानंतर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण २ सहस्र ६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त रसद पुरवण्यात आली आहे. यात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाकडूनही गर्दी नियोजनाचे काम करण्यात येईल.