यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम !
यवतमाळ, २६ जानेवारी (वार्ता.) – अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलीदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदु मानून सरकार काम करीत आहे. संकटाच्या काळात शासन, प्रशासन, सामाजिक संस्था, तसेच नागरिक यांच्या सहकार्याने ‘पुन:श्च हरिओम’ म्हणत राज्याची आणि जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल चालू झाली आहे, असे विचार राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. पोस्टल ग्राऊंड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते.