विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे ! – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

डॉ. जयंत नारळीकर

पुणे- हातामध्ये अत्याधुनिक भ्रमणभाष असला, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालत भविष्य पहाण्यासाठी त्याचा विनियोग केला जात असल्याचे पाहतो, तेव्हा एकविसाव्या शतकातही आपल्या धारणा बदललेल्या दिसत नाहीत, याची जाणीव होते, अशी खंत प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली. (स्वत:चे भविष्य साधनेने पालटू शकतो. यासाठी समाजाला धर्मशिक्षण दिल्यास समाज भविष्य पहाण्या ऐवजी साधना करण्यास लक्ष देईल. – संपादक) नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत नारळीकर यांनी दूरचित्र संवादाद्वारे मनोगत व्यक्त केले. विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे; पण आपणच मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडतो. त्यामुळे मुलांना इंग्रजीमधून समजून घेण्यास त्रास होतो आणि आपण मराठीचा वाचक अल्प करतो, हे मला अधिक चिंताजनक वाटते, असे नमूद करतांना डॉ. नारळीकर यांनी अल्बर्ट आईन्स्टाइन यांचा दाखला दिला. मराठीला जागतिक भाषेच्या दर्जाला जायचे असेल, तर भाषेचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे, याकडे डॉ. नारळीकर यांनी लक्ष वेधले.

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले की, विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ‘आयुका’सारखी संस्था डॉ. नारळीकर यांनी स्थापन केली. त्यामुळे डॉ. नारळीकर यांची निवड सार्थ आहे. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले की, डॉ. नारळीकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड स्वागतार्ह आणि आशादायक आहे.