अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवक सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले 

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विविध मान्यवर

सांगली, २५ जानेवारी (वार्ता.) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगलीच्या वतीने प्रत्येक वर्षी स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (२३ जानेवारी) हा कार्यकाळ  युवक सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रतिमा पूजन, विविध कार्यक्रम, उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याचसमवेत सांगली, विश्रामबाग आणि मिरज या नगरातील मुख्य चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी एकत्र जमलेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते

या युवक सप्ताहाचा समारोप नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी युवागर्जना या कार्यक्रमाने करण्यात आला. या कार्यक्रमाला विवेकानंद वैदिक प्रतिष्ठानचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. राम लाडे आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रा. ईश्‍वर रायांनावर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाविपचे सांगली महानगर अध्यक्ष प्रा. सुभाष मालगावे यांनी केले. वर्षभरातील कामाचा आढावा महानगरमंत्री श्री. विशाल जोशी यांनी  मांडला. यानंतर अभाविपचे सांगली जिल्हाप्रमुख प्रा. गुरु वाणी यांनी वर्ष २०२१ ची नवीन कार्यकारिणी घोषित केली.