‘परम पूज्य’ असा नामजप चालू झाल्यावर प्रवासात लागलेल्या चकव्यातून (वाईट शक्तीच्या एका प्रकारच्या त्रासातून) बाहेर पडता येणे

१. कुटुंबीय श्री सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेऊन येतांना परतीच्या प्रवासात चकवा लागल्याचे सर्वांना जाणवणे

‘३.३.२०२० या दिवशी आमच्या घरातील सर्व जण नाशिकजवळील श्री सप्तशृंगीमातेच्या दर्शनाला चारचाकीने गेले होते. देवीचे दर्शन झाल्यानंतर परत येतांना साधारण १४ कि. मी. अंतरापर्यंत ‘गाडी नेमकी कुठे जात आहे ?’, याविषयी त्यांना कुणालाही काही कळत नव्हते. वाहन पुढे जात होते; परंतु आजूबाजूला माणूस किंवा गाडी असे काहीही दिसत नव्हते. ‘काहीतरी विचित्र घडत आहे’, याची सर्वांना जाणीव झाली. ‘आपण बोललो, तर दुसर्‍याला भीती वाटेल’, या विचाराने कुणीही त्याविषयी बोलत नव्हते. ‘चकवा लागला आहे’, याची माझ्या भावाला जाणीव झाली; पण त्या वेळी ‘काय करावे ?’, हे त्याला सुचत नव्हते. (चकवा ही वाईट शक्ती प्रवास करणार्‍यांना चुकीचा मार्ग दाखवून शेवटी अपघात घडवून आणते. मायावी शक्ती शेवटी गाडी पाण्यात किंवा अशा ठिकाणी नेते की, अपघात होऊन सगळे जण ठार होतील.)

आधुनिक वैद्या (डॉ.)  कु. आरती तिवारी

२. साधिकेला कुटुंबियांना चकवा लागल्याचे जाणवणे आणि तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे

​त्याच वेळी मला गोवा येथे अकस्मात् सर्वांची आठवण आली आणि ‘त्यांना चकवा लागला आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. त्या वेळी चकवा देणारी वाईट शक्ती मला अंधारात एका पारदर्शक ढगाप्रमाणे दिसली. मी त्याविषयी कुटुंबियांना सांगण्यासाठी भ्रमणभाष केला. भ्रमणभाष भाचीने उचलला आणि आलेल्या अडचणीच्या प्रसंगाविषयी काहीच न बोलता तिने ‘नंतर संपर्क करते’, असे सांगितले. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘तुम्हीच सर्वांना सुखरूप परत घेऊन या’, अशी प्रार्थना केली.

३. भावाला संकटाची जाणीव होऊन त्याने सर्वांना ‘आरतीला (बहिणीला) प्रार्थना करायला सांगा’, असे सांगणे; वडिलांनी ‘गाडी थांबव’, असे सांगणे; त्याच वेळी लहान बहिणीला ‘आईचा मृत्यू झाला आहे’, असे दिसणे

​त्या वेळी भाऊ गाडीत सर्वांना म्हणत होता, ‘‘आरतीला (बहिणीला) प्रार्थना करायला सांगा आणि तिला ‘काय करायचे ?’, हे विचारा’’; पण भाचीला हे कळले नसल्याने तिने भ्रमणभाषवर मला तसे काही सांगितले नाही. तेव्हा माझे बाबा अकस्मात् ‘गाडी थांबव’, असे ओरडू लागले. ‘प्रसंग अणि वेळ पहाता गाडी थांबवणे अयोग्य आहे’, हे लक्षात घेऊन भावाने गाडी थांबवली नाही. त्याच वेळी ‘आईचा मृत्यू झाला आहे’, असे माझ्या लहान बहिणीला दिसले आणि त्याचा तिला ताण आला. ‘तेे सत्य आहे’, असे जाणवून ती रडू लागली आणि प्रार्थना करू लागली.

४. आईने ‘परम पूज्य’ हा नामजप चालू करणे, तेव्हा अकस्मात् एक ट्रॅक्टर समोर येऊन त्याने मार्ग दाखवणे

या वेळी आईने गाडीत ‘परम पूज्य’ हा नामजप चालू केला. त्या वेळी एक ‘ट्रॅक्टर’ अकस्मात् समोर आला आणि त्याने मार्ग दाखवला. काही वेळाने गाडीतील पेट्रोल संपत आल्याचे लक्षात आले. त्यानंतर पेट्रोल पंप दिसल्यावर जवळ असलेले पैसे संपले असल्याचे लक्षात आले. हे सर्व विचित्र घडत असल्याचे त्यांच्या लक्षात येत होते. आई, वहिनी आणि भाऊ यांनी स्वतःजवळचे सर्व पैसे एकत्र करून ३०० रुपयांचे पेट्रोल भरले अन् नंतर ते योग्य मार्गाला लागले.

५. सर्वांनी घरी आल्यावर चकव्याविषयी बोलणे आणि साधिकेलाही गोवा येथे असेच जाणवणे

​घरी आल्यावर बाबा म्हणाले, ‘‘मला वाटले, ‘चकवा लागला.’’ भाऊ म्हणाला, ‘‘मलाही तसेच वाटले. तुम्ही सर्व घाबराल; म्हणून मी बोललो नाही.’’ घरी आल्यावर सर्वांना हा वाईट शक्तींचा त्रास देण्याचा प्रकार असून चकवा लागल्याचे लक्षात आले. त्या वेळी मलाही गोवा येथे असेच जाणवले होते.

‘भगवंत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने या प्रसंगात एका मोठ्या मृत्यूयोगातून सर्व जण बाहेर आले आणि सुखरूप घरी पोचले’, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२०)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक