कल्याण – श्रीराम मंदिर न्यासाच्या वतीने श्रीराम जन्मस्थळी उभारण्यात येणार्या भव्य मंदिरासाठी देशभर निधी संकलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार निधी संकलनासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत संस्थेच्या वतीने कार्यालये उघडण्यात आली आहेत. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये चालणार्या या अभिनामध्ये कल्याण विभागातील १६ लाख ६९ सहस्र नागरिकांना संपर्क करून ३५ कोटी धनराशी संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निधी संकलनासाठी १०, १००, १ सहस्र रुपयांची कुपन सिद्ध करण्यात आली आहेत, तर २ सहस्र किंवा त्याहून अधिक रक्कम देणार्यांना पावती देण्यात येणार आहे. अधिकाधिक लोकांनी या मंदिर उभारणीसाठी अर्पण करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कल्याण येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
या वेळी विश्व हिंदू परिषदेचे कल्याण विभाग मंत्री अधिवक्ता मनोज रायचा, विश्व हिंदू परिषदेचे कल्याण जिल्हा मंत्री श्री. अभिषेक गोडबोले, कल्याण जिल्हा अभियान प्रमुख अधिवक्ता रोशन जगताप आणि कल्याण जिल्हा मातृ शक्ती प्रमुख अधिवक्ता सुधा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.