उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मंगळुरू येथील कु. चरणदास रमानंद गौडा (वय ७ वर्षे) !

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मंगळुरू येथील कु. चरणदास रमानंद गौडा (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. चरणदास रमानंद गौडा हा एक आहे !

(‘वर्ष २०१९ मध्ये कु. चरणदास याची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के होती.’- संकलक)

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी (२५.१२.२०२०) या दिवशी कु. चरणदास रमानंद गौडा याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई, मावशी आणि एक साधिका यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. चरणदास गौडा

१. सौ. मंजुळा गौडा (आई), मंगळुरू सेवाकेंद्र, कर्नाटक.

१ अ. सतर्कता : ‘चरणदास खेळत असला, तरी त्याचे ‘सभोवती काय चालू आहे ?’, याकडे लक्ष असते. त्याच्याकडे पहातांना ‘त्याचे लक्ष नाही’, असे आपल्याला वाटते; परंतु त्याला सर्व ठाऊक असते. तो ते सांगतो. खेळतांना किंवा एरव्हीही तो बहिर्मुख नसतो. ‘तो वेगळ्याच अवस्थेत असतो’, असे मला वाटते.

१ आ. तत्त्वनिष्ठ

१ आ १. ‘दादा स्वतःकडून झालेली चूक योग्य प्रकारे सांगून क्षमायाचना करत आहे ना ?’, हे पहाण्यासाठी चरणदासने दादाच्या समवेत तो क्षमायाचना करण्यासाठी जातांना समवेत येणे : एकदा त्याच्या दादाकडून चूक झाली होती. त्यासाठी त्याला आश्रमात सेवा चालू असलेल्या सर्व ठिकाणी जाऊन साधकांना चूक सांगून क्षमायाचना करण्यास सांगण्यात आले होते. त्याच्यासह चरणदासही गेला होता. तेव्हा साधकांशी त्याचे झालेले बोलणे येथे दिले आहे.

साधक : तू क्षमायाचना करणार नाहीस का ?

चरणदास : मी चूक केली नाही.

साधक : मग तू कशाला आला आहेस ?

चरणदास : ‘दादा योग्य प्रकारे चूक सांगत आहे ना ? काही राहू नये’, यासाठी आलो.

१ आ २. साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे : साधकांची काही चूक त्याच्या लक्षात आल्यास तो तत्त्वनिष्ठ राहून त्यांना ‘ही चूक होती ना ? असे करायला नको होते ना ?’, असे विचारतो आणि ती चूक तत्त्वनिष्ठेने उत्तरदायी साधकालाही सांगतो.

१ इ. प्रार्थना करून एकाग्रतेने नामजप करणे : चरणदास प्रतिदिन सकाळी ९ ते १० या वेळेत त्याचे वडील पू. रमानंदअण्णा यांच्यासह नामजपाला बसतो. नामजपाला बसण्याआधी ‘मी आणि दादाने आज कोणता नामजप करायचा आहे ?’, असे तो त्याच्या वडिलांना विचारतो आणि त्यांनी सांगितलेला नामजप करतो. नामजपाला बसण्याआधी त्याचे वडील त्यांना (गुरुदास आणि चरणदास यांना) सांगतात, ‘‘नामजपाला बसण्याआधी आपण श्री गुरूंचे चरण आपल्या डोळ्यांसमोर आणून त्यांवर आपले मस्तक ठेवूया आणि त्यांना प्रार्थना करूया, ‘हे गुरुदेव, मी अज्ञानी आहे. ‘नामजप कसा करायचा ?’, हे मला कळत नाही. तुम्हीच आमच्याकडून हा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण करवून घ्या. हा नामजप तुमच्या चरणी समर्पित होऊ दे’, अशी तुमच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’’ त्याप्रमाणे चरणदास हात जोडून एकाग्रतेने प्रार्थना करतो. नामजप करतांनाही अधूनमधून ‘आता प्रार्थना करूया’, असे म्हणून तो प्रार्थना करतो.

१ ई. तो डोळे मिटून एकाग्रतेने नामजप करत असतांना त्याच्या तोंडवळ्यात पालट होतो. तो शांत आणि आनंदी दिसतो. काही वेळा तो ‘मला गुरुदेवांचे दर्शन झाले’, असे आनंदाने सांगतो.’

२. कु. रूपा गौडा (मावशी), मंगळुरू सेवाकेंद्र, कर्नाटक.

२ अ. जिज्ञासू : ‘एकदा सत्संगात पू. अण्णा ‘आपण आपली अंतर्मुखता वाढवल्यास आपली साधनेत लवकर प्रगती होते’, असे सांगत होते. त्या वेळी दूर बसून ऐकत असलेल्या चरणदासने सत्संग संपल्यावर आपल्या आईला विचारले, ‘‘अंतर्मुखता म्हणजे काय ?’’ तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले, ‘‘आपण साधनेत कुठे न्यून पडतो ?’, हे शोधून आपल्यात तसा पालट करण्याचा प्रयत्न करणे’, म्हणजे अंतर्मुखता !’’ ते त्याला पटले.

२ आ. स्वतःच्या चुका मनमोकळेपणाने सांगणे : त्याच्याकडून काही चूक झाल्यास तो ती चूक मला, त्याच्या आईला आणि पू. अण्णांना सांगून क्षमायाचना करतो. तो मनात काही ठेवत नाही. तो सर्व चुका मनमोकळेपणाने सांगतो.

२ इ. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता : एकदा आम्ही नामजप करत होतो. त्या वेळी चरणदासही डोळे मिटून नामजप करत होता. नामजप करतांना मधेच माझे पाय पुष्कळ दुखू लागले. थोड्या वेळाने चरणदास माझ्या पायांवर येऊन बसला. तेव्हा पू. अण्णांनी त्याला विचारले, ‘‘तू मधेच उठून का आलास ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘अक्काचे पाय दुखत आहेत; म्हणून तिच्या पायावर जाऊन बसावे’, असा विचार मनात येत होता; म्हणून उठून आलो.’’ तो माझ्या पायांवर येऊन बसल्यावर माझे पाय दुखायचे न्यून झाले. यावरून ‘त्याला सूक्ष्मातून जाणीव होते आणि त्यावर तो तत्परतेने कृती करतो’, हे लक्षात आले.’

३. सौ. मंजुळा गौडा आणि कु. रूपा गौडा

३ अ. प्रगल्भता : ‘त्याचे खेळणेही आध्यात्मिक स्तरावरचे असते. एकदा प्रसारातील साधकांकडे जाऊन तो त्यांना हिंदी भाषेत म्हणाला, ‘‘आता आपण सत्संग घेऊया. मधुवंतीकाकू, तुमच्याकडून झालेली चूक सांगा.’’ त्यांनी त्या दिवशी त्यांच्याकडून झालेली चूक सांगितली. त्यांचे सांगून झाल्यावर त्यानेे दुसर्‍या साधकांना ‘या प्रसंगाविषयी तुम्हाला काय वाटते ?’, असे विचारले. त्यांचे सांगून झाल्यावर तो मधुवंतीताईंना म्हणाला, ‘‘काकू, ती कृती करतांना तुमच्या मनात कुठले विचार होते ?’’ असे तो मोठ्यांसारखा प्रगल्भपणे बोलतो आणि त्याचे विचारही प्रगल्भ असतात.

३ आ. प्रेमळ

३ आ १. गायीला ‘रागावू नये’, असे प्रेमाने समजावून सांगणे आणि त्यानंतर गायीचा तोंडवळा पालटून तिचा राग न्यून होणे : दिवाळीच्या वेळी आम्ही गावाकडे गेलो होतो. तिथे तो दिवसातील अधिक वेळ गायींसह घालवत असे. तो त्यांना चारा घालायचा आणि त्यांच्यासह बोलायचा. एकदा कुणीतरी वासराला मारले; म्हणून गायीला (वासराच्या आईला) राग आला होता. तेव्हा तो त्या गायीला समजावून सांगत होता, ‘रागावू नये. रागावल्यास तुला गुरुदेव भेटणार नाहीत. तुला गुरु हवेत ना ?’ गायही त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. नंतर त्या गायीचा तोंडवळा पालटला आणि तिचा रागही न्यून झाला.

३ आ २. तो स्वतःला मिळालेला खाऊ कुत्र्यांना घालून त्यांच्याशी प्रेमाने बोलतो.

३ इ. दूरदर्शी : ‘पुढे भीषण आपत्काल येणार आहे’, हे समजल्यावर तो प्रतिदिन पुठ्ठ्याची आणि खेळण्यातील (Brick Construction Set) घरे बांधतो. तो म्हणतो, ‘‘ही घरे साधकांसाठी बांधली असून पुढे सर्वांची व्यवस्था झाली पाहिजे.’’ तो एकमेकांत अडक पद्धतीने (इंटरलॉक पिसेसने) बांधत असलेली घरे पुष्कळ सुंदर असतात.

३ ई. देवाविषयीची ओढ

१. तो खेळण्यातील घरे बांधतो. तेव्हा त्यात मंदिराची सुंदर रचना करून ‘प्रतिदिन देवदर्शन आणि प्रार्थना करण्यासाठी मंदिर बांधले’, असे म्हणतो.

२. तो वहीत श्रीराम मंदिरासारखे चित्र काढून त्यावर ध्वज लावतो. ते पहातांना आनंद होतो.

३. त्याला मारुति पुष्कळ आवडतो. त्याला मारुतीचे चित्र किंवा ध्वनीचित्र-चकती (व्हिडिओ) पहायला आवडते. तो ‘मला बजरंग बली होऊन उड्डाण करायचे आहे’, असे म्हणतो. तो तसे हावभाव करतो.

४. सण असल्यावर तो त्या त्या देवतांविषयी माहिती विचारतो आणि ‘देवतांप्रमाणे मलाही संपूर्ण ब्रह्मांड फिरायचे आहे’, असे म्हणतो.

३ उ. संतांविषयीचा भाव : संतांचे आदर्श वागणे पाहून चरणदास त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. ‘पू. कर्वेमामा आणि पू. रमानंदअण्णा सकाळी किती वाजता उठतात ?’, हे पाहून ‘त्यांच्याप्रमाणे मीही सकाळी लवकर उठले पाहिजे’, असे तो म्हणतो आणि तसा प्रयत्नही करतो. तो बोलतांनाही ‘संतांनी सांगितलेल्या गोष्टींचे आज्ञापालन केले पाहिजे’, असे म्हणतो.

त्याची प्रत्येक कृती किंवा विचार इतरांना आनंद देणारा असतो. तो नेहमी सहजावस्थेत असतो. उच्चलोकातून आलेल्या मुलांचे विचार आणि त्यांची कृती साधनेशी जोडलेली असते. त्यामुळे इतरांनाही साधनेसाठी प्रेरणा मिळते. चरणदासच्या वागण्यामधून आम्हाला हे शिकायला मिळाले.

‘प.पू. गुरुदेवांमुळे आम्हाला ही संधी मिळाली’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

४. सौ. भव्या गौडा, बेंगळुरू

४ अ. प्रेमळ : ‘चरणदास सर्व साधकांशी अत्यंत प्रेमाने बोलतो. तो आपल्या कुटुंबियांशी जसा वागतो, तसाच सर्व साधकांशी वागतो. तो सर्वांकडे जातो आणि सर्वांना तेवढेच प्रेम देतो. गुरुदेव आणि संत नेहमी सांगतात, ‘‘आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत.’’ त्यांच्या या वाक्याची आठवण चरणदासचे प्रेमळ वागणे पहातांना येते.

४ आ. आपत्काळाची जाणीव असणे : तो खेळतांना ‘साधकांनी पुढे कसे असायला हवे ? आश्रम कसा करायचा ?’, असे चिंतन करतो. मी बेंगळुरू येथून मंगळुरूला आल्यावर तो माझ्याकडे येऊन म्हणाला, ‘‘अक्का, आपत्काल झाल्यावर आश्रम चांगला करूया.’’

४ इ. साधनेतील खेळ खेळणे : त्याच्या खेळण्यांतून तो मंदिर सिद्ध करतो आणि तिथे साधकांना नामजपाला बसण्यासाठी ‘ध्यानमंदिराकडे जाणारा मार्ग’ असे लिहितो. तो खेळतांनाही साधनेतील खेळ खेळतो. तो नेहमी सत्मध्येच असतो. इतक्या लहान वयात त्याची प्रत्येक कृती आणि हावभाव यांतून सात्त्विकतेची जाणीव होते.

४ ई. भाव : त्याचे वडील संत आहेत; परंतु तो आमच्याशी किंवा साधकांशी त्यांच्याविषयी बोलतांना ‘पू. अण्णा’ असेच म्हणतो.’ (डिसेंबर २०२०)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक