युद्धापेक्षा तणावामुळे अधिक प्रमाणात होत आहे भारतीय सैनिकांचा मृत्यू !

  • अधिक काळ चालत असलेल्या आतंकवादविरोधी कारवाईमुळे ताण !

  • सैन्य आणि संरक्षण मंत्रालय यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश नाही !

  • तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जाऊ शकतील ?
  • गेल्या ३ दशकांत भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्‍या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्वपक्षीय  शासनकर्त्यांना हे लज्जास्पद आहे !
  • सैनिकांमध्ये तणाव निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या समस्यांवर संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकार उपाय काढणार का ?
  • सैनिकांना साधना शिकवली असती, तर त्यांना चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळता आली असती ! हिंदु राष्ट्रात आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला साधना शिकवण्यात येईल !

नवी देहली – भारतीय सैन्य आतंकवादी आक्रमण किंवा पाकच्या गोळीबारात जितके सैनिक गमावत नाही, तितके सैनिक हे आत्महत्या, सहकार्‍यांकडून हत्या किंवा अपघात यांद्वारे गमावत आहेत. याखेरीज अर्ध्याहून अधिक सैनिक तणावात आहेत, असे  ‘युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’च्या (‘यु.एस्.आय.’च्या) एका अभ्यासातून समोर आले आहे. गेल्या दोन दशकांत ही तणावाची स्थिती फार वाढली आहे, असेही यातून समोर आले आहे.

१. यु.एस्.आय.चे कर्नल ए.के. मोर यांनी सांगितले की, भारतीय सैनिकांमधील तणाव वाढण्यामागे सैनिक अधिक काळापासून आतंकवादविरोधी कारवायांसाठी तैनात असणे, हे एक प्रमुख कारण आहे.

२. या अभ्यासातून असेही समोर आले आहे की, सैन्य आणि संरक्षण मंत्रालय यांनी तणाव न्यून करण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांना गेल्या १५ वर्षांत अपेक्षित यश लाभलेले नाही !

३. सैन्यात प्रतिवर्षी आत्महत्या आणि सहकारी सैनिकांच्या प्रती असलेल्या रागातून होणारी आक्रमणे यांमुळे १०० सैनिकांचा मृत्यू होतो. म्हणजे प्रत्येक तिसर्‍या दिवशी एकाचा मृत्यू होत असतो. यासह सैनिक आणि अधिकारी उच्च रक्तदाब, मनोविकार, न्यूरोसिस आदी व्याधींनीही ग्रस्त आहेत.

तणावाची कारणे

१. अल्प साधनसामुग्री, तैनाती आणि पदोन्नती यांत निष्पक्षता अन् पारदर्शकतेचा अभाव, रहाण्याची योग्य सुविधा नसणे आणि सुट्या न मिळणे, ही तणाव निर्माण होण्याची प्रमुख कारणे आहेत.

२. यासह कनिष्ठ अधिकारी आणि अन्य पदांवरील अधिकारी यांना सुट्या न मिळणे किंवा मिळण्यास विलंब होणे, अधिक काम, कौटुंबिक समस्या, वरिष्ठांकडून होणारा अवमान, भ्रमणभाष वापरण्यावर बंधने आणि त्यामुळे वरिष्ठांसमवेत होणारे वाद, हीसुद्धा तणावाची कारणे आहेत.