शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाचे पोलीस संरक्षणात सर्वेक्षण

सर्वेक्षणाला मान्यता देणार नसल्याचा ग्रामस्थांचा दावा : आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी

प्रातिनिधिक छायाचित्र

वाळपई, ५ जानेवारी (वार्ता.) – शेळ-मेळावली ग्रामस्थांचा तीव्र विरोध होऊनही शासनाने ५ जानेवारी या दिवशी अखेर प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठीच्या भूमीच्या सर्वेक्षणाचे काम छुप्या पद्धतीने पूर्ण केले. यानंतर आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला मान्यता देणार नसल्याचा दावा करून आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.

शेळ-मेळावली येथे सकाळी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी उपस्थिती लावली. पोलिसांना शेळ-मेळावली येथील सुमारे २०० ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात भरणा होता. या वेळी प्रकल्पाचे सीमांकन करण्यासाठी भूसर्वेक्षण अधिकारी आले होते. दिवसभर आंदोलनकर्ते आंदोलन करत असलेल्या ठिकाणी व्यस्त राहिले आणि भूसर्वेक्षण करणार्‍यांनी अन्य मार्गांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन सीमांकनाचे काम पूर्ण केले. ही गोष्ट दुपारी म्हणजेच सीमांकनाचे काम पूर्ण झाल्यावर भूसर्वेक्षण अधिकारी तेथून गेल्यावर आंदोलनकर्त्यांच्या लक्षात आली. यामुळे आंदोलनाच्या स्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये काही वेळ झटापटी झाली.