बीजिंग (चीन) – चीनमधील आणि जगातील मोठे उद्योगपती तथा ‘अलिबाबा’ समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा गेल्या काही मासांपासून सार्वजनिक ठिकाणी न दिसल्याने ते बेपत्ता असल्याचे वृत्त पसरले आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी त्यांचा आर्थिक धोरणांवरून वाद झाल्यामुळे त्यांना चीन सरकारने बेपत्ता केल्याचेही तर्क काढण्यात येत असतांना चीनच्या एका सरकारी वृत्तपत्राने खुलासा करत जॅक मा कुठे आहेत ?, हे स्पष्ट केले. ‘पीपल्स डेली’ या वृत्तपत्रानुसार ‘जॅक मा यांना एका अज्ञातस्थळी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच चिनी सरकारकडून जॅक मा यांना देश सोडून न जाण्याची चेतावणी देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.’