सर्वांना नाही, तर केवळ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील लोकांना कोरोना लस विनामूल्य मिळणार !

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी देहली – देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या केवळ पहिल्या टप्प्यात लस विनामूल्य दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणारे २ कोटी कर्मचारी यांना लस देण्यात प्राधान्य दिले जाणार आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले. त्याआधी डॉ. हर्षवर्धन यांनी ‘देशभरात कोरोनाची लस विनामूल्य देण्यात येईल’, असे विधान केले होते. त्यानंतर त्यांनी वरील स्पष्टीकरण देत केवळ पहिल्या टप्प्यांतील लोकांनाच ती विनामूल्य देण्याचे सांगितले.

डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता यांची निश्‍चिती करणे याला आमचे प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या; परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला.