मुंबई – ३१ डिसेंबर साजरा करतांना विनामास्क असणार्या १३ सहस्र १७९ जणांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत २६ लाख ३५ सहस्र ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. २० एप्रिलपासून पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत १८ कोटीपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.
कोरोना रोखण्यात मास्क महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे; मात्र अनेक जण दायित्वशून्यतेने विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे पालिका कर्मचारी, अधिकारी आणि क्लीनअप मार्शल यांच्या माध्यमातून जोरदार कारवाई चालू केली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तर ‘प्रतिदिन २० ते २४ सहस्र जणांवर कारवाई करावी’, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून जोरदार कारवाई चालू आहे. मुंबईत आतापर्यंतच्या कारवाईत २५ सहस्र ५७२ जणांवर कारवाई करण्यात आला असून त्यांच्याकडून १८ कोटी ८७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.