कोल्हापूर – कागल तालुक्यातील शेतकरी अनिल जाधव यांना महावितरण आस्थापनाने ५ अश्वशक्तीच्या (‘एच्.पी.’) विद्युत् पंपासाठी विद्युत जोडणी त्वरित द्यावी आणि ५ सहस्र १४८ रुपये भरपाई द्यावी, असा निकाल ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा पुष्पा तावडे, सचिव सुधाकर जाधव, ग्राहक सदस्य प्रशांत पुजारी यांनी दिला.
२५ मे २०१८ या दिवशी अनामत रक्कम भरूनही शेतकरी अनिल जाधव यांना विद्युत् जोडणी मिळालेली नव्हती. अनामत रक्कम भरल्यानंतर ३ मासांच्या आत वीज जोडणी देणे आवश्यक आहे; परंतु निधी नसल्याने जोडणी देता आलेली नाही, असे महावितरणच्या वतीने जाधव यांना सतत सांगण्यात येत होते. (वीज वितरण सारख्या आस्थापनाने निधी नसल्याने जोडणी देता येत नाही, असे सांगणे हास्यास्पद आहे. असे असेल तर घेतलेल्या अनामत रकमेचे काय केले, तेही आस्थापनेने सांगितले पाहिजे. – संपादक)
या काळात वीजपुरवठा नसल्याने शेतातील ऊस पिकाला पाणीपुरवठा करता आला नाही. यामुळे शेतीची प्रचंड हानी झाली. म्हणून साडेतीन लाख रुपये भरपाई आणि त्वरित वीज जोडणी द्यावी अशा मागणीचा अर्ज ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे शेतकरी अनिल जाधव यांनी केला होता. या कामात जाधव यांना जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अरुण यादव, सदस्य प्रशांत पुजारी, शिवनाथ बियाणी आदींचे मार्गदर्शन लाभले.