कोरोनाच्या विषाणूचे उगमस्थान मानल्या गेलेल्या वुहानमधील कोरोनाचे भयाण वास्तव मांडणार्या चीनच्या महिला पत्रकार झांग झान यांना ४ वर्षांच्या कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अशांतता आणि तणाव निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्याप्रमाणे अन्य काही पत्रकारांवरही कारवाई करण्यात आली आहे. झांग यांचा गुन्हा हाच की, त्यांनी वुहानमधील वस्तूस्थितीची जगाला ओळख करून दिली. एका नागरिकाचे ‘व्हॉट्सअॅप’वरील लिखाण वाचून वुहानमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तेथील रस्ते, रुग्णालये येथे असलेले चित्र त्यांनी मांडले. सरकारी यंत्रणांकडून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र सामाजिक माध्यमांवर त्यांचे लिखाण मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले.
झांग यांनी ज्या पत्रकारांना तेथे वार्तांकन करतांना अटक करण्यात आली, त्याविषयी आणि अन्य सरकारला उत्तरदायी ठरवणारे नागरिक यांना सरकारी यंत्रणेकडून जो त्रास दिला जात होता, त्याविषयी लिहिले होते. त्यांना झालेल्या शिक्षेविषयी चीनमधील मानवी हक्काच्या संघटनेने ‘ही इतरांना दिलेली चेतावणी असू शकते. वुहानमधील परिस्थिती बाहेर आणणार्या अन्य नागरिकांवरही दडपण आणण्यात येत आहे’, असे म्हटले आहे. तेथील वार्तांकन करणारे ली झेहुआ, शेन क्वीशी आणि फँग बिन हे पत्रकारही बेपत्ता होते. त्यांपैकी दोघांचा शोध लागला असून अद्याप एक पत्रकार बेपत्ता आहे. यापूर्वी चीनच्या ‘व्हायरॉलॉजी लॅब’मध्ये काम केलेल्या एका महिला शास्त्रज्ञाने ‘कोरोनाचा विषाणू हे चीन सरकारचेच पाप आहे. हा विषाणू घातक आहे, असे स्वत:च्या अहवालात देऊन सरकारला कळवले होते’, असे सांगितले; मात्र त्यांच्या मार्गावर चिनी यंत्रणा असल्यामुळे प्रथम त्यांना भूमीगत होऊन नंतर विदेशात आश्रय घ्यावा लागला. तेथूनच त्यांनी चीनचा भांडाफोड केला अन्यथा त्यांना शक्य झाले नसते. स्वत:च्याच देशातील महत्त्वाच्या क्षेत्रात कार्य करणार्या शास्त्रज्ञाच्या अहवालाकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करणारे चिनी सरकार खूनशीच म्हटले पाहिजे. कोरोनाने जगभरात हाहा:कार केलाच आहे, आता त्यापुढे जाऊन त्याच्या नव्या स्वरूपात आलेल्या ‘स्ट्रेन’ने आणखी खळबळ माजवली आहे. त्याने अनेकांना ग्रासले आहे आणि तो अधिक घातक असल्याचे बातम्यांवरून सिद्ध झाले आहे. ‘कोविड १९’ हे चीनचेच पाप आहे, हे एव्हाना जगाला कळून चुकले आहे. वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यावर प्राथमिक स्थिती जगासमोर हळूहळू येऊ लागली; मात्र जेव्हा अन्य देशांमध्ये वेगाने कोरोना पसरला, तेव्हा चीनमधून मृत अथवा बाधित यांची संख्या येणे बंद झाले. जणू चीनमध्ये सर्व काही आलबेल चालू आहे, असे दर्शवण्यात आले. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे अन्य देशांतील आकडे सहस्रो ते लाखांच्या घरात जात असतांना चीनमध्ये केवळ काही सहस्र नागरिकांचीच माहिती होती. याचे कारण आता लक्षात येत आहे की, ज्यांनी ही माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची चीनने मुस्कटदाबी केली, त्यांचा छळ केला. अशा क्रूर चीनवर भारतीय सीमेवर त्यांच्या बाजूने सांगण्यात येत असलेल्या स्थितीवर विसंबून रहाणे धोक्याचे आहे, हे येथे नमूद करणे आवश्यक !