उद्रेक होण्यापूर्वी…!

‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या कट्टर हिंदुद्वेषी आस्थापनाने पुन्हा एकदा हिंदु धर्मियांचा घोर अवमान करून हिंदूंना डिवचले आहे. या आस्थापनाच्या ‘किंडल’ या ‘ऑनलाईन’ पुस्तक विक्रीकेंद्रावर मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांच्या संबंधांवर अत्यंत अश्‍लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यास अनेक हिंदुत्वनिष्ठांनी विरोध करत अ‍ॅमेझॉनचा निषेध नोंदवला. परिणामी या आस्थापनाला ही पुस्तके मागे घ्यावी लागली. याला कुणी जर ‘हिंदूंचा विजय’ असे म्हणत असेल, तर तो त्याचा अपसमज ठरेल; कारण अ‍ॅमेझॉनने हिंदुविरोधी कृत्ये करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने हिंदूंना अनेकदा डिवचले आहे. इतकेच नव्हे, तर अशा प्रकारे अनेक वादग्रस्त वस्तू मागे घेतल्या आहेत अन् क्षमाही मागितलेली आहे. तरीही हे आस्थापन तीच तीच चूक पुनःपुन्हा जाणूनबुजून करत आहे. यास्तव सरकारने याची गंभीर नोंद घेणे आवश्यक आहे.

मूळात आपण इतिहासातून काहीच शिकत नाही, हा आपला आत्मघातकी दोष आहे. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने व्यापाराच्या गोंडस नावाखाली भारतात प्रवेश करून देशावर कसे नियंत्रण मिळवले, हे सर्वज्ञात आहे. व्यापाराच्या नावाखाली तिने नियोजनबद्ध पद्धतीने येथील श्रद्धा, संस्कृती, परंपरा, नीतीमूल्ये यांवर आघात करत भारताला पारतंत्र्याच्या खाईत लोटले. आज ‘ईस्ट इंडिया’चीच झूल ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ने पांघरली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जगात कुठेही व्यापार करायचा म्हटला की, त्या देशाची संस्कृती, परंपरा नीतीमूल्ये यांचा आदर करायला हवा. यातील एकही गोष्ट ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ पाळतांना दिसत नाही. उलट ते केवळ १०० कोटी हिंदूंच्या देवतांचा करता येईल तितका अवमान सातत्याने करत आहे. एवढे होऊनही सरकारने अ‍ॅमेझॉनविरुद्ध आजपर्यंत एकदाही ठोस कारवाई केलेली नाही, हे विशेष ! हेच या आस्थापनाचे बलस्थान बनले आहे. असे करून अ‍ॅमेझॉन सरकारलाही अडचणीत आणत आहे; कारण ‘हिंदूंच्या धर्मभावना दुखावूनही सरकार काहीही करत नाही’, अशी नकळत भावना हिंदूंच्या मनात निर्माण होऊ शकते, ज्याचा परिणाम सरकारच्या मतपेटीवर होऊ शकतो. दुसरीकडे काही तुरळक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा अपवाद वगळता अ‍ॅमेझॉनच्या हिंदुद्वेषी कृत्याचा एकाही हिंदूने साधा निषेधही नोंदवलेला नाही. उलट हिंदू त्यांच्याचकडून सर्व वस्तू खरेदी करतात. एकूणच सरकारी उदासीनता आणि हिंदूंची निद्रिस्तता यांमुळे या आस्थापनाचे चांगलेच फावले आहे. हिंदु देवतांचा अवमान करतांना त्यांना कुणाचेही भय म्हणूनच वाटत नाही. अशा स्थितीत प्रश्‍न असा पडतो की, सरकार या हिंदुद्वेषी आस्थापनावर बंदी का घालत नाही ? या आस्थापनाविरुद्ध असंख्य तक्रारी प्रविष्ट होऊनही पोलीस-प्रशासन त्याच्यावर कारवाई का करत नाही ? अ‍ॅमेझॉनविरुद्ध उद्रेक होण्यापूर्वीच सरकारने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या या आस्थापनाला बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, अशी हिंदूंची एकमुखी मागणी आहे.

महिलावादी संघटना गप्प का ?

अ‍ॅमेझॉनने त्यांच्या ‘किंडल’वर ‘इंडियन हिंदु वाईफ्स अफेर विथ हर मुस्लिम लव्हर’ (भारतीय हिंदु पत्नीचे मुसलमान प्रियकराशी प्रेमप्रकरण), ‘इंडियन वाइफ चिटिंग : सेक्स विथ नेबर’ (फसवणूक करणारी भारतीय पत्नी : शेजार्‍यासमवेत संबंध) अशी अत्यंत हिडिस आणि कट्टर हिंदुद्वेषी पुस्तके विक्रीस ठेवली आहेत. मुळात १०० कोटी हिंदू असलेल्या देशात अ‍ॅमेझॉनचे अशी पुस्तके विक्री करण्याचे धाडस होतेच कसे ? सरकारला याविषयी काहीच वाटत नाही का ? हिंदूही मूग गिळून गप्प आहेत. खरे तर अ‍ॅमेझॉनचा बोलवता धनी कोण आहे, याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. त्यांच्या या कृत्यामागे कोणते आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे का, याची चौकशी झाली पाहिजे; कारण भारतात अस्थिरता पसरवण्याचे चीन आणि पाकिस्तानचे काम अ‍ॅमेझॉन नेटाने करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकांद्वारे हिंदु महिलांची अपकीर्ती होऊनही महिलांच्या हक्कासाठी लढणार्‍या संघटना गप्प आहेत. त्या आता कुठे गायब झाल्या ? तथाकथित महिलांच्या हक्कासाठी म्हणून मंदिरात प्रवेश करण्याचा अट्टहास करणार्‍या तृप्ती देसाई यांना या पुस्तकाच्या विरोधात संघर्ष करावासा का वाटत नाही ? कि त्यांना महिलांच्या या अपकीर्तीविषयी काहीच वाटत नाही ? यावरून महिला हक्काविषयीची या सर्वांची ओरड बेगडी आणि प्रसिद्धीलोलुप आहे, असे समजायचे का ?

आर्थिक नाड्या आवळा !

‘ज्याला जी भाषा कळते, त्याला त्याच भाषेत समजावावे’, असे म्हणतात. याप्रमाणे व्यापार्‍यांना अर्थविषयक सूत्राद्वारे समज देणे योग्य ठरते. एका आकडेवारीनुसार ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ची भारतातील वार्षिक उलाढाल अनुमाने १२ सहस्र कोटी रुपयांहून अधिक आहे. भारतात ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’चे अनुमाने १ कोटी ग्राहक आहेत. देशातील प्रचंड लोकसंख्येमुळे विदेशातील कुठल्याही व्यापारी आस्थापनासाठी भारत ही सर्वोत्तम बाजारपेठ आहे. त्यामुळेच तर वर म्हटल्याप्रमाणे अशा आस्थापनांना येथील संस्कृती, नीतीमूल्ये, परंपरा आदी जपणे आवश्यक असते. तथापि जी आस्थापने आमचे राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचा अवमान करतात, त्यांच्यावर बंदी घालून त्यांना या देशातून हाकलून दिले पाहिजे. यातून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील आणि ते आपोआप वठणीवर येतील. अशा आस्थापनांना हीच भाषा समजते, हे लक्षात घ्यायला हवे. यासह सरकारने भारतात व्यापारासाठी येणार्‍या आस्थापनांना ‘आमचे राष्ट्र आणि धर्म प्रथम’, हे ठणकावून सांगितले पाहिजे, तसेच त्यांच्या धार्मिक भावना पायदळी न तुडवण्याची सक्त ताकीद दिली पाहिजे. तशा अटीच त्यांना त्यांनी आपल्या देशात व्यापार चालू करण्यापूर्वी घातल्या पाहिजेत. त्यात कुठलीही तडजोड होता कामा नये. असे झाले, तरच या देशात हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याचे धाडस कुणीही करू धजावणार नाही. ‘अ‍ॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अ‍ॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे १०० कोटी हिंदूंनी विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे.