संपादकीय : युद्धाचा उत्तरार्ध चालू !

काही दिवसांपूर्वी इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध  थांबल्यानंतर संपूर्ण जगाने सुटकेचा श्वास सोडला. या युद्धाचा ज्या ज्या देशांना फटका बसला होता, ते जरा कुठे निवांत होत नाहीत, तोच अमेरिकेने इराणवर प्रचंड शक्तीनिशी पुन्हा आक्रमणे चालू केली. त्यास इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. परिणामी उत्तरार्ध युद्ध केवळ चालू झाले नाही, तर ते चांगलेच पेटले आहे. याचे कारण ठरले ते इराणने ओमानच्या खाडीतील एका नौकेवर केलेल्या कथित आक्रमणाचे ! कथित अशासाठी की, हे आक्रमण इराणने केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे, तर इराणने हा आरोप फेटाळून लावला आहे. इराणच्या स्पष्टीकरणावरून विश्वास न ठेवता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी रातोरात शांतता करार जाळून क्षेपणास्त्रांच्या ज्वाळा इराणपर्यंत पोचवल्या. यावरून दोन्ही देशांमध्ये झालेला ‘शांतता करार’ किती तकलादू होता, हेही या निमित्ताने समोर आले. खरेतर या तकलादूपणाची आणि ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीची इराणला पूर्णपणे कल्पना होतीच. त्यांचे नेते तसे बोलूनही दाखवत होते. शेवटी त्यांची ही शंका किंवा भीती खरी ठरली. इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अमेरिकेविरुद्धचा जनक्षोभही अमेरिकेने स्वतःसाठीची चेतावणी मानून घेतल्याचे सांगितले जात आहे. हेही युद्धाचे कारण असल्याचे म्हटले जाते. कारण काहीही असो, युद्धाचा उत्तरार्ध चालू झाला आहे, हे खरे !

जगातील कुठलेही युद्ध केवळ रणांगणावर लढले जात नाही. ते आर्थिक, भूराजकीय, ऊर्जा संसाधनांवरील नियंत्रण, वर्चस्व आदी सूत्रांवरही लढले जाते. अमेरिका-इराण युद्धही त्याला अपवाद नाही. वरकरणी हा संघर्ष सुरक्षेचा किंवा प्रत्युत्तराचा वाटत असला, तरी त्यामागे इराणची प्रादेशिक शक्ती न्यून करण्याचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतात. या साठमारीचा सामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसतो. बाँब आणि क्षेपणास्त्रे सीमांवर डागली जात असली, तरी त्यांचे परिणाम शहरांतील बाजारपेठा, रुग्णालये, शाळा आदींवर होतात. युद्धामुळे सहस्रो कुटुंबांचे जीवन विस्कळीत होते. अर्थव्यवस्था कोलमडते, महागाई वाढते, रोजगाराच्या संधी उणावतात. त्यामुळे युद्धात विजय कुणाचा झाला ?, यापेक्षा त्याची किंमत कुणाला मोजावी लागली ? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. म्हणून तर ‘युद्ध नेहमी शत्रूच्या भूमीत लढले पाहिजे’, असे म्हटले जाते. असो. अमेरिका-इराण युद्धाच्या उत्तरार्धात आपण काय भूमिका घ्यायची ?, असा प्रश्न अनेक देशांना पडला आहे. अमेरिका संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचेही ऐकायला सिद्ध नाही, किंबहुना संयुक्त राष्ट्रांनी संयम राखण्याच्या केलेल्या आवाहनाला अमेरिकेने केराची टोपली दाखवत स्वतःची क्षेपणास्त्रे इराणच्या दिशेने सोडली. दुसरीकडे ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीतून (दोन जलाशयांना जोडणार्‍या जलमार्गातून) जाणार्‍या सर्व मालावर २० टक्के कर आकारण्याची घोषणा केली. यामुळे सर्व देशांना येथून मालाची ने-आण करण्यासाठी आता अमेरिकेला पैसे द्यावे लागणार आहेत. याची परिणती अर्थातच तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढण्यामध्ये होणार आहे. एकूणच हे युद्ध चिघळण्याच्या मार्गावर आहे. यावरून या युद्धाचा उत्तरार्ध किती भयानक असेल ?, याची आपण कल्पना करू शकतो. हे युद्ध अधिक भडकू नये, तसेच चिघळू नये, यासाठी सर्वच देशांनी एकत्र येऊन ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे, अन्यथा अनेक लहान देश देशोधडीला लागतील.

आसुरी महत्त्वाकांक्षेसाठी जगाला युद्धाच्या खाईत लोटणार्‍या देशांवर अन्य देशांनी एकत्र येऊन बहिष्कार घालणे आवश्यक !