उतारवयातही आध्यात्मिक जीवनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी (२३.१२.२०२०) या दिवशी सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे आजोबा यांचा वाढदिवस आहे.

पू. सदाशिव आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

पू. सदाशिव परांजपे आजोबा यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

​‘दैवी प्रवासानिमित्त आमचे काही वेळा सांगली आणि मिरज या ठिकाणी जाणे झाले. त्या वेळी एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेले असता आम्हाला त्यांच्या आई-वडिलांचा, म्हणजेच आमच्या लाडक्या पू. आजी-आजोबांचा सत्संग लाभला. ते अध्यात्म जगणारे आदर्श आजी-आजोबा आहेत. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आई-वडील पू. सदाशिव आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे हे शिव-पार्वतीसमान असल्याचे जाणवणे

​महर्षींनी एकदा एका नाडीवाचनात सांगितले होते, ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या शिवपुत्री आहेत.’ हे आध्यात्मिक विवेचन तर आहेच आणि प्रत्यक्षातही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या आई-वडिलांचे नाव हे शिव-पार्वतीचेच, म्हणजे सदाशिव अन् शैलजा असे आहे. आजी-आजोबा नावाप्रमाणेच सात्त्विक आहेत. ते दोघेही सतत भावावस्थेत असतात. आजींची व्यक्त आणि आजोबांची अव्यक्त भावस्थिती अनुभवण्यास येते.

२. आजोबांनी घरातील बागेची मुलाप्रमाणे काळजी घेणे आणि आजींनी देवाची पूजा भावपूर्णरित्या करणे

​सांगलीला घराच्या आवारात आजोबांनी फार सुंदर बाग लावली आहे. जास्वंद, जुई, ब्रह्मकमळ, प्राजक्त, तुळस अशा विविध झाडांनी ही बाग बहरली आहे. आजोबा या बागेची अगदी मुलाप्रमाणे काळजी घेतात. ते प्रतिदिन सकाळी बागेतील फुले वेचून आणून आजींना पूजेसाठी देतात. आजीही देवपूजा भावपूर्णरित्या करतात.

३. आजी-आजोबांनी मुली आणि नातवंडे यांना दिलेली संस्काराची शिदोरी !

​श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू सांगतात, ‘‘आई-वडिलांनी आम्हा बहिणींना लहानपणापासूनच सुसंस्काराचे बाळकडू पाजले. ‘लहान-मोठ्यांशी कसे वागायचे ? स्वयंपाक कसा करायचा ? पूजा आणि सण-वार कसे साजरे करायचे ? वातावरण आनंदी कसे ठेवायचे ? पूर्वजांनी सांगितलेल्या धार्मिक कृतींचे शास्त्र’, हे सर्वच त्यांनी आम्हाला शिकवले. आजही ते त्यांच्या नातवंडांना घडवत आहेत. ते सर्वांवर प्रेम करतात आणि ज्या ठिकाणी कठोर वागायला हवे, तेथे कठोरही वागतात.’’

४. वागण्या-बोलण्यातून इतरांना आनंद देणे

​आजी-आजोबांचे लहानपण कष्टात गेले; पण असे असले, तरीही ते स्वतःहून त्याविषयी कधीच सांगत नाहीत. याउलट ‘देवाने आम्हाला किती दिले आहे, आम्ही आनंदी आहोत आणि इतरांनाही आनंद कसा देता येईल’, असेच त्यांचे वागणे-बोलणे असते. ‘घरी आलेला प्रत्येक जीव हा देव आहे’, असा त्यांचा भाव असतो.

५. शिकण्याची वृत्ती

​पू. परांजपेआजी ‘अँड्रॉइड प्रणालीचा भ्रमणभाष कसा वापरायचा ?’, ते शिकल्या आहेत. त्यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि ‘शेअर इट’ या प्रणालीही शिकून घेतल्या आहेत. याचा त्या सेवेसाठी उपयोग करतात. त्या घरी राहून टंकलेखनाची सेवा करतात. ‘आम्ही आता वयस्कर झालो आहोत. आम्हाला ‘हे सर्व शिकून काय करायचे ?’, असे त्यांना मुळीच वाटत नाही.

६. सहसा म्हातारपणाची बर्‍याच जणांना काळजी वाटते; पण आजी-आजोबांना पाहून ‘म्हातारपणही आनंदी असू शकते’, हे पहायला मिळते.

७. ‘अध्यात्म जगण्यासाठी स्थळ, काळ आणि वय यांची मर्यादा नसते’, हे आजी-आजोबांकडून शिकायला मिळते.

‘सतत इतरांचा विचार करणे, इतरांना आनंद देण्यासाठी जगणे, भावावस्थेत रहाणे, अशा अनेक गुणांचा सम्मुचय असलेल्या आजी-आजोबांकडून शिकून आम्हालाही अध्यात्मात गुरूंना अपेक्षित अशी वाटचाल करता येऊ दे’, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. दिवाकर आगावणे, पुणे (१९.८.२०१७)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक