पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीचे भारतियांवर झालेले दुष्परिणाम ! 

शिक्षणाच्या पाश्‍चिमात्यकरणाचे फलस्वरूप म्हणून भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. व्यक्ती पूर्णतः स्वार्थी आणि एकांगी होत चालली आहे. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय जीवनशैलीला विसरत चाललो आहोत. मग ते कमोड असो, टूथपेस्ट असो, ‘बाथटब’ असो, स्वयंपाकगृहात उभे राहून स्वयंपाक करणे असो, कॉन्टिनेन्टल अन्नपदार्थ असो किंवा झोपण्यासाठी ‘डबल बेड’ असो. हे सर्व काही पश्‍चिमेकडील जीवनशैलीच तर आहे ना ! ना आहार-विहार भारतीय राहिला आणि ना व्यवहार राहिला. परिणामस्वरूप आजचा तरुण वर्ग भारतीय संस्कृती आणि परंपरा सर्व विसरत चालला. आश्‍चर्य तर या गोष्टीचे आहे की, तो (तरुण वर्ग) पाश्‍चात्त्य जीवनशैलीलाच आपले (भारतीय) जीवन मानून जगत आहे आणि नित्य नव्या व्याधींचा शिकार होत आहे.

भारतीय समाजाला या हीन बोधातून मुक्त करावयाचे असेल, तर शिक्षणामध्ये आमूलाग्र परिवर्तन करावे लागेल. त्यात भारतीय ज्ञान, परंपरा आणि विचारधारा यांचा समावेश करावा लागेल. शिक्षणाचा आधार अध्यात्म बनवून त्याला पाश्‍चात्त्य प्रभावापासून मुक्त करायला पाहिजे. जोपर्यंत आजची शिक्षणपद्धत पाश्‍चात्त्यांच्या प्रभावापासून मुक्त होणार नाही, तोपर्यंत भारतीय शिक्षणाला प्रतिष्ठा मिळणार नाही. त्यासाठी समाजामध्ये शिक्षणाचे भारतीयीकरण करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या उद्देशाने राजसत्तेवर अवलंबून न रहाता समाजातील विद्वानांना पुढे यावे लागेल.’

– श्री. ईश्‍वर दयाळ

(संदर्भ : मासिक ‘संस्कारम्’, जून २०१७)