गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली ! – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने ‘गोवा@६०’ हा सांस्कृतिक कार्यक्रम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पणजी – गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि याचे श्रेय यापूर्वी गोव्यात शासन करणार्‍या सर्व सरकारांना जाते, असे प्रतिपादन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोमंतकियांना गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा दिल्या. गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने आयोजित ‘गोवा@६०’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थितांना संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रपति रामनाथ कोविंद पुढे म्हणाले, ‘‘गोव्याने ६० वर्षांत प्रगती केल्याने आज गोव्याचे दरडोई उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यात ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम राबवून स्व. मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेत आहेत. कोरोना महामारीच्या काळात गोव्यात औषध आस्थापनांनी विश्‍वस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माहितीतंत्रज्ञान क्षेत्रासाठी गोवा राज्य हे महत्त्वाचे ठिकाण बनत आहे. गोमंतकियांच्या आदरातिथ्य करण्याच्या गुणामुळे गोव्यात पर्यटक आकर्षित होत असतात.’’

याप्रसंगी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘पर्यटन आणि खाण हे व्यवसाय राज्याचा कणा आहेत; मात्र यासमवेतच आता राज्याने शेतीवरही भर दिला पाहिजे. गोमंतकातील युवकांनी सेनेमध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्यास सिद्ध होणे आवश्यक आहे.’’ गोव्यात विविध विकास प्रकल्पांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, ‘‘आज विकासकामांना विरोध करणे, ही एक सवय झालेली आहे. वास्तविक एकत्रित बसून आपल्यामधील मतभेद दूर करणे आवश्यक आहे.’’ देशात कृषी विधेयकांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘कृषी विधेयकाला विरोध करणारा पंजाब आता शांत होत आहे. शेतकर्‍यांना विरोधी पक्षाच्या देशविरोधी कारवायांविषयी जाणीव होत आहे. शेतकर्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे.’’

राज्यपाल कोश्यारी यांनीही या वेळी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या वेळी म्हणाले, ‘‘गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांच्या माध्यमातून शासन प्रत्येक गोमंतकियापर्यंत पोचणार आहे. ‘गोवा@६०’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शिक्षणासमवेत सर्व क्षेत्रांचा पुढील ६० वर्षांचा आराखडा (ब्ल्यू प्रिंट) निश्‍चित केला जाणार आहे.’’