केरळमधील ख्रिस्त्यांचा हलाल मांसाला विरोध

हिंदू संघटनांचे ख्रिस्त्यांना समर्थन

थिरूवनंतपूरम् (केरळ) – नाताळच्या काळात हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचा निर्णय केरळमधील ख्रिस्त्यांनी घेतला आहे. ‘येशूच्या जन्मदिनी हलाल मांस का खावे ?’ असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. ख्रिस्त्यांची संघटना ‘चर्चस अ‍ॅक्सिलरी ऑफ सोशल अ‍ॅक्शन’ने ख्रिस्त्यांना आवाहन केले आहे की, ‘त्यांनी हलाला मांस खाऊ नये.’ याला हिंदूंच्या संघटनांनीही समर्थन दिले आहे. हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की, राज्यात हिंदूंनाही हलाल मांस विकण्यासाठी बाध्य केले जाते.

इंडियन युनियन मुस्लिम लीगने या निर्णयावर म्हटले की, हा मुसलमानांच्या मांसांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याचा केलेला प्रयत्न आहे.

हलाल मांस म्हणजे काय ?

‘झटका सर्टिफिकेशन अथॉरिटी’चे अध्यक्ष रवि रंजन सिंह यांनी सांगितले की, हिंदु, शीख आदी भारतीय धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्याचा बळी दिला जातो. यामध्ये प्राण्याची मान एकाच वारमध्ये कापली जाते. यामुळे प्राण्याला अल्प प्रमाणात त्रास होतो. याउलट ‘हलाल’ पद्धतीत प्राण्याची गळ्याची नस चिरली जाते आणि सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहाते आणि नंतर तडपून तडपून त्याचा मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा चेहरा मक्केच्या दिशेने केला जातो, तसेच हे काम मुसलमानेतरांना दिले जात नाही. आज ‘मॅकडोनल्ड’ आणि ‘लुसिअस’सारखी आस्थापने केवळ हलाल मांसांचीच विक्री करत आहेत.