राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालये यांमध्ये काम करणार्‍या परिचारिकांच्या समस्यांचा अहवाल आरोग्यमंत्र्यांना सादर !

राजेश टोपे

पुणे – सरकारी आणि खासगी रुग्णालये यांमध्ये काम करणार्‍या परिचारिकांसमोरील आव्हानांचा साथी संस्थेने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यास केला. यामध्ये कोरोनाच्या काळात राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये यांतील परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. कोरोनाकाळात अधिक काम, पीपीई किटचा अपुरा पुरवठा, विलंबाने वेतन होणे आणि वेतनकपात, कोरोनाभत्ता न मिळणे यांसारख्या अनेक समस्यांना परिचारिकांना सामोरे जावे लागत आहे. यातील महत्त्वाची सूत्रेे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर ठेवण्यात आली आहेत, असे साथी संस्थेच्या आधुनिक वैद्या श्‍वेता मराठे यांनी सांगितले.
साथी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३६७ परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्यात ८८ टक्के महिला होत्या. ५० टक्के महिला ३० ते ४५ वर्षे वयोगटातील होत्या. २३.६ टक्के परिचारिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यांसारखे आजार आहेत. २.७ टक्के परिचारिका गर्भवती किंवा स्तनदा माता होत्या. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७७ टक्के परिचारिका सरकारी रुग्णालयातील, तर २३ टक्के खासगी रुग्णालयातील होत्या. ४७ टक्के परिचारिकांच्या वेतनात कपात झाली आणि व्यवस्थापनाकडून दबाव आणला जात असल्याचे २३ टक्के परिचारिकांनी सांगितले.