कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर संसदेचे हिवाळी अधिवेशन रहित ! – केंद्र सरकारचा निर्णय

जानेवारी २०२१ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार

संसदेचे कुठलेही अधिवेशन असले, तरी ते शांततेत पार पडते, असा इतिहास नाही. जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून चालवण्यात येणार्‍या अधिवेशनात जर गदारोळच करण्यासाठी लोकप्रतिनिधी येणार असतील, तर त्याचा जनतेला काय उपयोग ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात येतो !

नवी देहली – कोरोनाच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षांकडून मात्र अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या २० दिवसांपासून देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशन घेण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्नशील होते; मात्र सरकारने अधिवेशन न घेण्याचा निर्णय घेतला.

१. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशन बोलावण्यात येऊ नये, असे म्हणणे पडले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारी २०२१ मध्ये बोलावण्यात येणार आहे.

२. अधीर रंजन चौधरी यांनी मात्र ‘संसदेचे अधिवेशन बोलावले पाहिजे. कायद्यातील पालटांसाठी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर चर्चा आवश्यक आहे’, असे म्हटले आहे.