योगासनाच्या माध्यमातून देशातील मुलांचे शरीर आणि संकल्प दृढ करणे हे राष्ट्रकार्य घडणार ! – योगऋषी स्वामी रामदेव

संगमनेर (जिल्हा नगर) – प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या योगासनाच्या माध्यमातून देशातील मुलांचे शरीर आणि संकल्प दृढ करणे हे राष्ट्रकार्य आपल्या हातून घडणार, असे प्रतिपादन योगऋषी स्वामी रामदेव यांनी केले. नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने संगमनेर येथील ३ दिवसांच्या योगासन परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या ऑनलाईन उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

योगऋषी स्वामी रामदेव

गेल्या मासात आयुष मंत्रालयाकडून मान्यता मिळालेल्या नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे महासचिव डॉ. नागेंद्र यांनी वैश्‍विक प्रसारासाठी देशातील अबालवृद्धांना या प्रवाहात आणण्यासाठी स्पर्धांचे मोठे महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले. फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. बसवशेट्टी यांनी योग हा जन्मतःच भारतीयांच्या अंगी असलेला उपजत गुण आहे आणि त्याला आता खेळाचा दर्जा प्राप्त झाल्याने त्याचा वेगाने प्रसार अन् प्रचार करण्याची संधी प्राप्त झाली आहे.