पालकांनी केवळ निषेध नोंदवून न थांबता मनमानी कारभार करणार्या शाळा प्रशासनाला चूक दुरुस्त करायला लावणे अपेक्षित आहे.
पिंपरी – कोरोनाच्या काळात सर्वत्र शाळा ऑनलाईन चालू असतांना संपूर्ण वर्षाचे शुल्क आकारले जात आहे. याविषयी पालकांनी महापालिका शिक्षण विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध पॅरेंट्स असोसिएशनने लेखी तक्रारीप्रमाणे शाळेला सुनावणीसाठी बोलावले होते; परंतु शाळेने आमच्याकडे पालकांची एकही तक्रार नाही, असे सांगत सुनावणीला गैरहजेरी दर्शविली. त्यामुळे कायद्याला न जुमानणार्या शाळेविरुद्ध पालकांनी शाळेसमोर, चिंचवडगावातील अहिंसा चौक आणि दर्शन हॉल समोर फलक लावले आहेत. आम्ही फसलो, तुम्ही नका फसू !, आमच्या मुलांच्या भवितव्याचे काय ?, असे प्रश्न शाळा व्यवस्थापनाला फलकाद्वारे उपस्थित केले आहेत.
यावर पालकांनी लावलेल्या फलकाविषयी काहीच माहिती नसल्याचे शाळेचे समन्वयक शिवप्रसाद तिवारी यांनी सांगितले. (कोरोनाच्या काळात शाळा ऑनलाईन चालू असतांना आणि ऑनलाईनसाठीचा पैसा पालकांच्याच खिशातून जात असतांना संपूर्ण वर्षाचे शुल्क आकारणे हे अन्यायकारक आहे. तसेच सुनावणीला अनुपस्थित रहाणार्या शाळांचा कारभार कसा असेल हे वेगळे सांगायला नको. – संपादक )