चित्रपटातील ‘आयटम डान्स’, अश्‍लील चित्रपटे बलात्काराची मानसिकता निर्माण करतात ! – राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

डुमका (झारखंड) येथे पतीसमोर विवाहित महिलेवर १७ जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण

बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना घडतात. यांसह समाजामध्ये नैतिकता निर्माण करण्यासाठी त्याला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. साधना शिकवली असती, तर असे घडले नसते !

राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

रांची (झारखंड) – आदिवासी भागात मुलगी किंवा महिला यांवर बलात्कार होईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. आदिवासी संस्कृतीत बलात्काराला स्थान नाही; पण जेव्हापासून आधुनिक समाजाच्या नावे जी संस्कृती चालू झाली आहे त्यामध्ये महिलेला उपभोगाचे साधन म्हणून दर्शवले आहे. चित्रपटातील आयटम डान्स, विज्ञापने, भ्रमणभाषमधील अश्‍लील चित्रे आदी गोष्टी बलात्काराची मानसिकता निर्माण करत आहेत, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केले आहे. राज्यातील डुमका येथे एका विवाहित महिलेचे अपहरण करून १७ जणांनी पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिला पाच मुलांची आई आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेवर तिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तिवारी पुढे म्हणाले की, आदिवासी भागात हे पोचणे म्हणजे समाजातील तळापर्यंत पोचले आहे. जोपर्यंत बलात्काराची मानसिकता निर्माण करणार्‍या गोष्टी आहेत तोपर्यंत त्याच्यावर नियंत्रण कसे आणणार ? ‘निर्भया’सारख्या घटनेनंतर कायदे करण्यात आले; पण आम्ही त्यावेळीही सांगितले होते की, शिक्षा वाढवल्याने या गोष्टी थांबतील हा अपसमज आहे. जोपर्यंत बलात्काराला उत्तेजित करणार्‍या गोष्टी आहेत तोपर्यंत ते थांबणार नाही आणि आजही माझे तेच म्हणणे आहे.