डॉ. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वहाण्यास गेलेले हिंदु मक्कल कत्छीचे अर्जुन संपथ यांच्याशी द्रमुक आणि व्ही.सी.के. यांच्या कार्यकर्त्यांकडून गैरवर्तन

समानतेसाठी लढा देणार्‍या बाबासाहेबांच्या नावाखाली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजाचा व्यापक विचार करू शकतील का ?

हिंदु मक्कल कत्छीचे अर्जुन संपथ

चेन्नई (तमिळनाडू) – येथे हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष अर्जुन संपथ डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील राजा अन्नामलाई पूरम् येथील स्मारकामध्ये गेले होते. तेव्हा तेथे द्रमुक आणि विदुथलाई चिरुथैगल कत्छी (व्ही.सी.के.) या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेश करण्यापासून रोखले. तसेच संपथ यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी त्यांनी ‘आम्ही सनातन धर्म उखडून फेकून देऊ आणि भगवा नष्ट करू’, असेही म्हटले. व्ही.सी.के.चे झेंडे हातात घेतलेल्या दोघा धर्मांधांनी संपथ यांच्या गळ्यातील भगवे उपरणे खेचून घेण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी संपथ यांच्यावर आक्रमण करण्याचाही प्रयत्न केला. तसेच स्मारकामध्ये ‘भारत माता की जय’ घोषणा देण्यासही विरोध केला. या वेळी पोलिसांच्या साहाय्याने संपथ यांनी डॉ. आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली.

या घटनेविषयी संपथ म्हणाले की, सामाजिक न्यायाची गोष्ट करणार्‍यांनी मला डॉ. आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखले. ही एक प्रकारची अस्पृश्यतेसारखी कृती होती. बाबासाहेबांचे नाव घेणार्‍यांना याची लाज वाटली पाहिजे. बाबासाहेब केवळ या संघटनांचे नेते नाहीत, तर ते भारतियांचे नेते आहेत. सरकारने या कार्यकर्त्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.