पुणे – तत्कालीन राज्य सरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियान सर्वांत यशस्वी ठरले होते. त्या वेळी निर्णय घेतांना आमच्यासोबत शिवसेना होती. तेव्हा त्यांनी कोणत्याही निर्णयाला विरोध केला नाही; पण आता सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे. या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पुण्यात व्यक्त केली.
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या वेळी प्रतिष्ठेची असणार्या जलयुक्त शिवार योजनेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर या योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने माजी सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनाने (ईडी) धाडसत्र आणि चौकशी चालू केल्यामुळे राज्य सरकारने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे, यावर वरील प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली आहे.