शासकीय रुग्णालयांत गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेतल्यास वाईट परिणाम होतील ! – आमदार नीतेश राणे यांची चेतावणी

नीतेश राणे

कणकवली – गोरगरिबांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालये आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न येथील डॉक्टरांनी करू नये. तसे झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कक्षामध्ये रुग्णांना भेडसावणार्‍या समस्यांच्या अनुषंगाने आमदार नीतेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याशी चर्चा केली. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष राजन चिके, नगरसेविक मेघा गांगण, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ८ वैद्यकीय अधिकार्‍यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती, तरीही तेथील परिस्थितीत काही पालट झाला नव्हता. त्यामुळे पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉ. टाक यांना घेराव घातला, तसेच या वेळी कार्यकर्त्यांनी डॉक्टर टाक यांना ते एका व्यक्तीकडून दाखला देण्यासाठी पैसे घेत असल्याचा ‘व्हिडिओ’ त्यांना दाखवला होता.

हे सूत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. तेव्हा आमदार नीतेश राणे यांनी ही चेतावणी दिली. तसेच या प्रकरणी संबंधिताची चौकशी करून योग्य ती कारवाई करा, अशा सूचना डॉ. चव्हाण यांना दिल्या. या वेळी ‘या प्रकरणाची चौकशी करून संबधितांला नोटीस दिली  जाईल’, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील हे कामावर उपस्थित नसतात, या सूत्रावर त्यांनाही नोटीस देण्यात येईल, डॉ. चव्हाण यांनी सांगितले.