प्रयागराज, ९ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्रात हरवलेल्या व्यक्तींसाठी १० ‘खोया-पाया केंद्रे’ (हरवले-गवसले केंद्रे) कार्यरत आहेत. महाकुंभामध्ये ४० कोटींहून अधिक भाविक येणार असल्याने आणि अनेक ठिकाणी पुष्कळ मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. यामध्ये एखादी व्यक्ती हरवल्यास तिला शोधणे पुष्कळ कठीण होऊ शकेल, या दृष्टीने शासनाने एकूण १० ‘खोया-पाया केंद्रे’ कार्यान्वित केली आहेत.
एखादी व्यक्ती हरवली, तर या केंद्रांचा कसा लाभ होईल ? या विषयी खोया-पाया केंद्राचे प्रमुख आणि प्रकल्प व्यवस्थापक श्री. मनीष झा यांनी ‘सनातन प्रभात’ला माहिती देतांना सांगितले की, कोणतीही व्यक्ती कुंभमेळ्यात येतांना तिच्याकडे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र असे एकतरी ओळखपत्र असायला हवे. त्याचसमवेत तिच्या नातेवाइकांचा क्रमांक असायला हवा. संबंधित व्यक्ती हरवल्यास त्या आधारे तिच्या नातेवाइकांपर्यंत पोचू शकतो किंवा तिच्या नातेवाइकांनी आम्हाला संपर्क केल्यास आम्ही व्यक्तीपर्यंत पोचू शकतो. आमची १० केंद्रे एकमेकांशी जोडलेली आहेत, त्याचप्रमाणे ती एआय तंत्रज्ञानाने अद्ययावत् असून कुंभक्षेत्रातील मोठ्या डिजिटल स्क्रीनशी जोडलेली आहेत. त्यामुळे एखादी व्यक्ती हरवल्यास तिला आम्ही लवकरात लवकर शोधून काढू शकतो. समजा एखादी व्यक्ती अथवा तिचे नातेवाईक आमच्या केंद्रात आल्यास त्यांना संबंधित व्यक्ती सापडेपर्यंत येथे स्त्री आणि पुरुष अशी वेगवेगळी थांबण्याची व्यवस्था आम्ही केली आहे.