प्रयागराज, १० जानेवारी (वार्ता.) – अमृतस्नानाच्या वेळी १२ किलोमीटरच्या महाकुंभक्षेत्रात असलेल्या ४४ घाटांवर उत्तरप्रदेश शासनाद्वारे हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार आहे. या दृष्टीने प्रशासनाकडून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. महाकुंभक्षेत्रात ३५ जुने आणि ९ नवीन पक्के घाट आहेत. या सर्व घाटांवर साधू, संत आणि भाविक अमृत स्नानाच्या वेळी स्नान करतात. या वेळी महाकुंभमध्ये १० सहस्रहून अधिक संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावर्षी भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी महाकुंभामध्ये ४० कोटींहून अधिक भाविक सहभागी होतील, असा अनुमान उत्तरप्रदेश प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.