अभ्यासू आणि संशोधक वृत्तीमुळे ‘सुजोक’ ही उपचारपद्धत विकसित करून निरपेक्षतेने अन् तळमळीने रुग्णांवर उपचार करणारे पुणे येथील श्री. एस्.के. जोशीआजोबा (वय ८० वर्षे) !

‘रामनाथी आश्रमातील आम्ही काही साधक पुणे येथील श्री. जोशीआजोबा यांच्याकडे ‘सुजोक’ उपचारपद्धतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी मला लक्षात आलेली आजोबांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

श्री. एस्.के. जोशी

१. परिचय

कु. रोशेल नाथन्

श्री. एस्.के. जोशी (वय ८० वर्षे) हे गेली २० वर्षे कोथरूड, पुणे येथे ‘सुजोक’ उपचारपद्धतीने रुग्णावर उपचार करत आहेत. पूर्वी श्री. जोशीआजोबा भारतीय लष्करात होते. तेथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवीही प्राप्त केली आहे. आजोबा या वयातही पुष्कळ उत्साही आणि सक्रीय आहेत, तसेच ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.

२. श्री. जोशीआजोबांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

२ अ. अभ्यासू आणि संशोधक वृत्ती : सामान्यतः कोणत्याही उपचारपद्धतीमध्ये रुग्णात आढळणारी आजाराची लक्षणे किंवा त्याची शारीरिक स्थिती यांनुसार उपचार केले जातात; पण आजोबांनी या उपचारपद्धतीचा अभ्यास सूक्ष्म आणि ऊर्जा या स्तरांवर केला असल्याने त्यांचा या उपचारपद्धतीचा सखोल अभ्यास झाला आहे. असे असले, तरी आजोबांचे काही विशिष्ट आजारांसाठी योग्य उपचार शोधून काढण्याच्या दृष्टीने संशोधन चालूच आहे. ‘सुजोक’ ही उपचारपद्धती रुग्णाचा आजार समूळ नष्ट करते. हे उपचार सूक्ष्म-स्तरावरील असल्यामुळे त्याचे परिणामही बहुतांश वेळा यशस्वी ठरतात.

२ आ. प्रेमभाव : आजोबांच्या घरी पुष्कळ रुग्ण उपचारासाठी येतात. त्या रुग्णांचे तोंडवळे तणावग्रस्त असतात. आजोबा त्यांचे बोलणे संयमाने ऐकून घेऊन त्यांना सांगतात, ‘‘आजार आणि चिंता तेथेच सोडून चिंतामुक्त होऊन घरी जा.’’ ते विनोद करून रुग्णाला हसवतात आणि वातावरण हलके करतात. त्या वेळी आम्हाला जाणवले, ‘आजोबा त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक रुग्णाचे दायित्व घेतात. ‘रुग्णाने स्वतःच्या सर्व चिंता त्यांच्यावर सोपवून आनंदाने घरी जावे’, असा त्यांचा प्रयत्न असतो.’ याच कारणामुळे त्यांच्या घरी अत्यंत सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. ‘एखादा रुग्ण आजारातून बरा होण्याच्या आशेने जेव्हा आधुनिक वैद्य वा उपचारकर्ता यांच्याकडे येतो, तेव्हा त्याच्याशी कसे वागावे ?’, हे आम्हाला आजोबांकडून शिकायला मिळाले. आजोबांनी ही उपचारपद्धत आम्हाला पुष्कळ प्रेमाने आणि तळमळीने शिकवली. त्यामुळे आम्हाला ती लवकर शिकता आली. तसेच त्यातून शिकण्याचा आनंदही मिळवता आला.

आम्ही आश्रमात परत आल्यानंतरही आजोबांना एखाद्या रुग्णावर उपचार करण्याविषयीची शंका किंवा एखादा प्रश्‍न विचारल्यावर आजोबा त्याचे उत्तर तत्परतेने देतात.

२ इ. रुग्णांना बरे करण्याची तळमळ : आजोबा उपचारासाठी येणार्‍या रुग्णांकडून अत्यंत अल्प उपचारमूल्य घेतात. त्या उपचारमूल्यात उपचारासाठी लागणार्‍या साहित्याचाही समावेश असतो. आजोबा येणार्‍या प्रत्येक रुग्णावर अत्यंत सेवाभावाने उपचार करतात. ते म्हणतात, ‘‘उपचाराचा मोबदला म्हणून मला किती पैसे मिळतील ?’, यापेक्षा ‘माझा सेवाभाव कसा वाढेल ?’, असा विचार प्रत्येकाने करायला हवा.’’

२ ई. स्वतःकडील ज्ञान निरपेक्षपणे इतरांना देणे : आजोबा करत असलेली बहुतांश उपचारपद्धत ही त्यांनी स्वतः केलेल्या संशोधनावर आधारित असून ती सखोल आहे; मात्र त्यांनी ती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता अनेक लोकांना शिकवली आहे. वर्ष २०१४ पर्यंत आजोबा ही उपचारपद्धत शिकवण्याचे वर्ग घेत असत. त्याद्वारे त्यांनी ७५० हून अधिक लोकांना ही पद्धत शिकवली आहे. त्यासाठी ते विद्यार्थ्यांकडून अत्यल्प मूल्य घेत असत. या मूल्यात उपचाराला आवश्यक साहित्याचाही समावेश असायचा. सर्व रुग्णांना उपचारासाठी आजोबांकडे येणे शक्य नाही. त्यामुळेे ‘हे उपचार शिकायला येणार्‍या व्यक्तींनी स्वतःच्या गावी परत गेल्यावर तेथील रुग्णांवर अल्प मूल्यात उपचार करता यावे’, या उद्देशाने आजोबांनी अत्यंत वाजवी मूल्यात ही उपचारपद्धती अनेकांना शिकवली.

२ उ. चार – पाच वर्षे शिकवणीचे वर्ग बंद केले असतांनाही सनातन संस्थेच्या नावामुळे सनातनच्या साधकांना विनामूल्य उपचार शिकवणे : सनातन संस्थेच्या एका साधकाच्या माध्यमातून आजोबांना संस्थेच्या कार्याचा परिचय झाला. त्यांना संस्थेचे कार्य आवडल्याने त्यांनी गेली ४ – ५ वर्षे शिकवणीचे वर्ग बंद केले असतांनाही सनातनच्या साधकांना विनामूल्य उपचार शिकवण्याचे मान्य केले. आजोबा त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक रुग्णाला ‘हे सनातन संस्थेचे साधक असल्याने मी इतक्या वर्षानंतर त्यांना शिकवायला सिद्ध झालो’, असे सांगायचे.

आजोबांनी आम्हाला शिकवलेली ही उपचारपद्धत स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरही कार्य करते. आम्ही त्यांच्याकडून ही उपचारपद्धत शिकण्यासाठी १५ दिवस गेलो होतो. त्या कालावधीत आजोबांनी आम्हाला या उपचारांचा बहुतांश भाग शिकवला. त्या वेळी तेथे आलेल्या त्यांच्या काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले, ‘‘साधकांना ही उपचारपद्धत एवढ्या लवकर कशी शिकता आली ?’’ त्यावर आजोबा म्हणाले, ‘‘गुरूंची कृपा आणि सनातनच्या आश्रमातील पोषक वातावरण यांमुळे साधक ही उपचारपद्धत तुलनेने लवकर शिकू शकले.’’

२ ऊ. हिंदु धर्माविषयी असलेली श्रद्धा आणि प्रेम : एकदा आम्हाला शिकवतांना आजोबा सहजपणे म्हणाले, ‘‘जगात लवकरच सनातन धर्माची स्थापना होणार असल्याचे भविष्यकथन आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘त्या वेळी आपल्या सर्वांना प्रत्येक व्यक्तीला सनातन धर्माचे ज्ञान देण्याची पुष्कळ सेवा करावी लागणार आहे.’’ त्यांचे हे वाक्य ऐकून आम्हाला पुष्कळ आश्‍चर्य वाटले आणि त्यांना हा विषय ठाऊक असल्याचे आमच्या लक्षात आले. प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याशी ‘भावी आपत्काळ आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ यांविषयी काहीच बोललो नव्हतो; पण आजोबांना या विषयाचे ज्ञान आहे. ‘त्यांना हिंदु धर्माविषयी पुष्कळ प्रेम आणि श्रद्धा आहे’, असेही आम्हाला जाणवले.

२ ए. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : ‘आजोबांमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे’, हे दर्शवणारे त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग पुढीलप्रमाणे आहेत.

१. पूर्वी आजोबा लष्करात होते. त्यामुळे त्यांना पुष्कळदा जंगलातून प्रवास करावा लागत असे. एकदा आजोबा त्यांच्या गटासह एका जंगलातून चालले होते. तेथे त्यांना एका झाडाखाली मोठी दाढी असलेले एक योगी ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यांच्या समोर त्यांचे काही शिष्य भूमीवर बसले होते. आजोबांना ‘दाढीवाल्या योगी महाराज यांना नमस्कार करावा’, असे वाटले. त्यानुसार आजोबा त्यांना नमस्कार करण्यासाठी त्यांच्या जवळ गेले. ते त्यांचे चरणस्पर्श करणार, एवढ्यात योगी महाराजांनी डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले. ‘त्या वेळी योगी महाराजांचे डोळे लाल होते’, असे आजोबांनी सांगितले. आजोबा तेथून परत येत असतांना त्या महाराजांचा एक शिष्य त्यांच्यामागे पळत आला आणि त्याने विचारले, ‘‘तुम्ही असे काय केलेत की, महाराजांनी डोळे उघडले ? ‘योगी महाराजांनी एकदा आमच्याकडे पहावे’, यासाठी आम्ही येथे अनेक वर्षांपासून येत आहोत. काही लोक पिढ्यान् पिढ्या त्यांच्या एका दृष्टीक्षेपासाठी येथे येतात.’’

. एके दिवशी एक व्यक्ती त्यांच्या रुग्ण नातेवाईकाला घेऊन आजोबांकडे उपचारासाठी आली. रुग्णाला पायर्‍या चढून वर आजोबांच्या घरी येणे अशक्य होते; म्हणून रुग्ण व्यक्ती खाली चारचाकीत बसून राहिली. त्याच्या समवेत आलेल्या व्यक्तीने रुग्णाचे सर्व वैद्यकीय अहवाल आजोबांना दाखवले. आजोबांनी अहवाल पाहून ‘रुग्णाची स्थिती चिंताजनक आहे; परंतु मी उपचार करीन’, असे सांगितले. आजोबांनी त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी त्यांच्या एका उपचारकर्त्याला खाली पाठवले. त्यानंतर रुग्णासमवेत आलेली व्यक्ती उपचारांचे मूल्य देण्यासाठी आल्यावर आजोबांनी तिला अप्रत्यक्षपणे सांगितले, ‘‘मला या रुग्णाच्या समवेत यमदूत आल्याचे दिसले. त्यामुळे रुग्ण फार काळ जगू शकणार नाही.’’ या प्रसंगाविषयी सांगतांना आजोबा म्हणाले, ‘‘त्या रुग्णावर कोणता उपचार करायचा ?’, याचा आदेश मला सूक्ष्मातून मिळाला होता.’’ प्रत्यक्षात आजोबांनी त्या रुग्णाला पाहिलेही नव्हते, तरीही ‘त्याच्यावर कोणता उपचार करायचा ?’, याविषयीचे सूक्ष्मातील ज्ञान त्यांना ग्रहण करता आले.

३. एके दिवशी आजोबांकडे दोन रुग्ण उपचारांसाठी आले होते. आजोबांनी त्यांच्याकडे पहिले आणि त्यांना २ दिवसांनी यायला सांगितले. २ दिवसांनंतर ते रुग्ण दगावल्याचे आजोबांना समजले. या प्रसंगाविषयी सांगतांना आजोबा म्हणाले, ‘‘ते २ रुग्ण आत आल्यावर मला त्यांच्या समवेत यमदूतही आलेले दिसले. त्यामुळे मी त्यांना २ दिवसांनी यायला सांगितले.’’

आजोबा नियमितपणे ध्यान-धारणा करतात आणि इतरांनाही शिकवतात. एकदा याविषयी सांगतांना ते सहजपणे म्हणाले, ‘‘मी संपूर्ण दिवस, म्हणजे शिकवतांना, भोजन करतांना किंवा झोपतांना ध्यानावस्थेत असतो.’’ त्या वेळी ‘आजोबा सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असतात’, असे आम्हाला जाणवले. पुष्कळदा आम्हाला ‘ते स्थुलातून येथे आहेत; पण सूक्ष्मातून ईश्‍वराशी एकरूप झालेले आहेत’, असे जाणवत होते.

२ ऐ. अल्प अहं : आजोबांकडे या उपचारपद्धतीविषयी प्रगाढ ज्ञान आहे, तसेच त्यांनी अनेक रुग्णांवर केलेले उपचार यशस्वी ठरले आहेत. असे असूनही आजोबांना त्याचा अहं नाही. ते म्हणतात, ‘‘या एकूण उपचारपद्धतीविषयी केवळ १० टक्केच ज्ञान मला ठाऊक आहे. मी रुग्णांना बरे करण्याचे केवळ एक माध्यम आहे.’’ आजोबांनी स्वतःकडे असलेले सर्व ज्ञान इतरांना दिले आहे. सामान्यतः भौतिक जीवनात बर्‍याचदा आपण पहातो की, ज्या व्यक्तींकडे पुष्कळ ज्ञान असते, त्यांना तेवढाच अहंकारही असतो. अशा व्यक्ती स्वतःकडील सर्व ज्ञान इतरांना देत नाहीत आणि दिलेच, तर त्याचे भरमसाठ मूल्य आकारतात. आजोबांमध्ये मात्र इतरांना शिकवण्याची आणि त्यांची सेवा करण्याची तीव्र तळमळ आहे.

आजोबांना रंग उपचारपद्धत (कलर थेरपी), दैवी अंकशास्त्र (डिव्हाईन नंबर), रेकी अशा कित्येक उपचारपद्धतींचे ज्ञान आहे; पण त्यांना त्याचा अहं नाही.

‘आजोबांमधील या गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक पातळी चांगली असावी’, असे मला वाटते.

– कु. रोशेल नाथन्, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक