७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा चालू करण्याचा निर्णय ! – जिल्हाधिकारी दौलत देसाई

दौलत देसाई

कोल्हापूर – इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतचे वर्ग प्रथम सर्व शिक्षकांची कोरोना पडताळणी आणि पूर्वसिद्धता करून टप्याटप्याने चालू करण्याचा निर्णय संस्थाचालक, पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

देशातील देहली, मुंबई, पुणे परिसरांत कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि नुकत्याच झालेल्या दिवाळी-दसरा सणांमुळे लोकांचा एकमेकांशी झालेला संपर्क यांमुळे नजिकच्या काळात कोरोना रुग्णांच्या संसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात संस्थाचालक, पदाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली. या परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.


जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या शिक्षकांना खासगी प्रयोगशाळांकडून कोरोना पडताळणी करायची असेल, त्यांना तशी मुभा राहील. २३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही. सर्व शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण झाल्याविना आणि मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी लेखी संमती दिल्याविना शाळा चालू करता येणार नाहीत. यासाठी कालावधी लागणार असल्याने ७ डिसेंबरनंतर शाळा चालू केल्या तरी त्यास संमती देण्यात आली आहे. जोपर्यंत शाळा पूर्ण क्षमतेने चालू होत नाहीत, तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण चालू ठेवणे आवश्यक आहे. मधल्या कालावधीत कोरोनाच्या संसर्गात वाढ दिसून आली, तर या निर्णयात पालट होऊन शाळा चालू ठेवण्यास स्थगिती देण्यात येईल, असा निर्णयही घेण्यात आला.

सांगली महापालिका क्षेत्रात २३ नोव्हेंबरपासून ८ वी ते १० चे वर्ग चालू करण्याची सिद्धता !


सांगली – महापालिका क्षेत्रात २३ नोव्हेंबरपासून ८ वी ते १० चे वर्ग चालू करण्याची सिद्धता चालू आहे. यात महापालिका क्षेत्रातील ११० शाळांचा समावेश आहे. खासगी आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून १ सहस्र ८२३ जणांची कोरोना पडताळणी केली जात आहे. या पडताळणीत अद्यापतरी कोणी बाधित आढळला नसला, तरी प्रत्येकाची पडताळणी केली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचा अहवाल कोरोनाबाधित आल्यास त्यावर पुढील उपचाराची सिद्धता महापालिका प्रशासनाकडून केली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चारुदत्त शहा यांनी दिली.