१ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरांत इलेक्ट्रिक ‘बाईक टॅक्सी’ धावणार ! – राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय निवडण्याची सोय !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्यशासन विविध उपक्रमांची कार्यवाही करत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी इलेक्ट्रिक ‘बाईक टॅक्सी’ला मान्यता दिली आहे. १ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक ‘बाईक टॅक्सी’ धावणार असून यामध्ये महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. याविषयीच्या धोरणास १ एप्रिलला मंत्रीमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत मान्यता दिली.

१. रस्त्यावरील वाहनसंख्या अल्प होण्यासाठी खासगी दुचाकी वाहनांसाठी बाईक पुलिंगच्या पर्यायालाही शासनाने मान्यता दिली आहे. अशा वाहनांना मोटार वाहन कायद्यांतर्गत योग्यता प्रमाणपत्र, विधीग्राह्य परवाना आणि विमा संरक्षण बंधनकारक असणार आहे.

२. ‘बाईक टॅक्सी’च्या प्रवासी भाड्याचे शुल्क हे संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे निश्चित करण्यात येईल. ‘बाईक टॅक्सी’मुळे अल्प व्ययात प्रवासासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य रहाणार आहे. या धोरणांतर्गत केवळ परिवहन संवर्गातील इलेक्ट्रिक ‘बाईक टॅक्सी’च धावणार आहेत.

३. यामुळे नागरिकांना स्वस्त प्रवासाच्या पर्यायासह ‘लास्ट माईल कनेक्टिव्हीटी’चा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रदूषण आणि वाहतूककोंडी अल्प होणार आहे.

तसेच प्रवासाचा वेळ अल्प होईल आणि रोजगारनिर्मितीस साहाय्य होईल. केवळ २० ते ५० वर्षे वयोगटांतील चालकांनाच ‘बाईक टॅक्सी’ सेवा देता येणार आहे.