बेंगळुरू येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक संपत राज यांना काँग्रेसच्या आमदाराच्या घरावर आक्रमण करण्यासाठी धर्मांधांना चिथावल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली. ते येथील माजी महापौरही आहेत. ११ ऑगस्टच्या रात्री बेंगळुरू शहरातील देवरा जीवनहळ्ळी आणि कडुगोंडनहळ्ळी भागांत ही दंगल झाली होती. धर्मांधांनी देवरा जीवनहळ्ळी आणि कडुगोंडनहळ्ळी पोलीस ठाण्यांना आग लावली होती. तसेच काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरालाही आग लावण्यात आली होती. गुजरात येथील दंगली नंतर तेथील तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हणणार्या सोनिया गांधी यांनी दंगल भडकावण्याचा आणि स्वत:च्याच पक्षाच्या आमदाराच्या घरावर आक्रमण करण्यासाठी चिथावल्याचा आरोप असलेल्या पक्षाच्या नगरसेवकाला कोणती उपमा द्यावीशी वाटते ? त्यांनी अजूनपर्यंत तोंडही उघडलेले नाही; ते का ? शांती आणि अहिंसा यांचा पुजारी म्हणवून घेणार्या पक्षाला अशी माणसे चालतात का ? येथे काँग्रेसचे दुटप्पी वागणे दिसून येते. शीखविरोधी दंगलीचा ठपका असलेले जगदीश टायटलर आणि कमलनाथ यांना काँग्रेसने पाठीशी घातले, कमलनाथ यांना तर मध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदही दिले.
इतरांना असहिष्णू, राज्यघटनाविरोधी, शांतताविरोधी, देशविरोधी असे बोलणे सोपे आहे. स्वत:च्या पक्षातच असे लोक असतांना त्याविषयी मात्र मौन ! देशावर सर्वाधिक काळ राज्य केलेल्या काँग्रेसची ही स्थिती आहे. बेंगळुरू दंगलीत ४ लोकांचा मृत्यू आणि पोलिसांसह कित्येक जण घायाळ झाले, तर पुष्कळ वित्तहानी झाली होती. दंगलीमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेले भय अजून गेलेले नाही. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे दंगल आटोक्यात येऊ शकली. काँग्रेस आणि जनतादलाची संयुक्त सत्ता असती, तर दंगल त्वरित थांबली असती का ? याची काहीच शाश्वती नाही. काँग्रेसने ती स्वत: कितीही म्हटले की, आम्ही बापूंच्या अहिंसेच्या मार्गावर चालतो, तर त्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही. खरे तर संपत राज यांना जनतेने निवडून देणे, हेही चुकीचेच आहे. आतातरी जनतेने शहाणे होऊन अशा लोकप्रतिनिधींना निवडून न देता त्यांना घरी बसवायला हवे. मध्यंतरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता की, पूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर गुन्हे विश्वातील ‘दादा’लोक यायचे आणि काँग्रेसी नेते त्यांना भेटण्यासाठी धडपडत. यातून काँग्रेसचे आणि गुन्हे विश्वाचे संबंध किती जुने आहेत, हे लक्षात येते. अशा काँग्रेसला जनता सत्तेपासून दूर ठेवते आणि तिच्यापासून चार हात दूर रहाते, यात नवल ते काय !