घोटाळ्याचा आरोप असणारे मेवालाल चौधरी यांना केले बिहारचे शिक्षणमंत्री !

घोटाळ्याचा आरोप असणार्‍यांना केवळ भारतातच शिक्षणमंत्री किंवा अन्य मंत्रीपदे मिळू शकतात, हे लक्षात घ्या !

मेवालाल चौधरी

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील नवनिर्वाचित सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटपही घोषित झाले आहे. यातील जनता दल (संयुक्त) चे आमदार मेवालाल चौधरी यांना शिक्षणमंत्री करण्यात आल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. चौधरी पूर्वी शिक्षक होते. ते सबौर कृषी विश्‍वविद्यालयाचे कुलपती असतांना वर्ष २०१२ मध्ये साहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधक यांच्या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सबौर पोलीस स्थानकामध्ये वर्ष २०१७ मध्ये या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणामध्ये चौधरी यांना न्यायलयाने अंतरिम जामीन दिला होता. चौधरी यांच्याविरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आलेले नाही. या प्रकरणामुळे चौधरी यांना थेट शिक्षणमंत्री केल्याने सरकारवर टीका होत आहे.

भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांना महत्त्वाचे अर्थ खाते मिळाले आहे. विशेष म्हणजे प्रसाद केवळ १२ वी शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना अर्थ खात्यासारखे महत्त्वाचे खाते दिल्यानेही सरकारवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.