डिचोली, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोमातेच्या रक्षणासाठी राज्यातील विविध गोशाळांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दीपावलीतील पाडव्याचे औचित्य साधून रविवार, १५ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक सिकेरी येथील गोशाळेला भेट देऊन गोपूजन केले. गुरांना पोळे (आंबोळ्या) भरवले आणि यज्ञयाग केला.
या वेळी ते म्हणाले, ‘‘गोशाळांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. मोकाट बेवारशी गोवंशियांना गोशाळेत आश्रय मिळू लागल्याने मोठा दिलासा मिळत आहे. नवनवीन कल्पना आणि धोरणे आखून राज्यातील गोशाळा सक्षम केल्या जात आहेत. बेवारशी गोवंशियांची देखभाल करण्यासाठी गोशाळेला अनुदान पुरवले जाते. यासमवेतच राज्यात धवलक्रांती आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोधन वाढवण्यावर भर दिला जात आहे, तसेच गुरांच्या शेणापासून विविध उत्पादने बनवण्यासाठी आत्मनिर्भर योजनेला चालना दिली जात आहे.’’
कार्यक्रमाच्या आरंभी मुख्यमंत्री सावंत यांनी गोशाळेच्या संकेतस्थळाचे आणि नूतनीकरण केलेल्या गोशाळेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी गोप्रेमी कमलेश बांदेकर, कमलाकांत तारी, संदेश बाराजणकर, रूपेश ठाणेकर, सरपंच तुळशीदास चोडणकर, डॉ. राजेश केणी, डॉ. पर्रीकर, तुळशीदास परब, प्रकाश आरोंदेकर, दया कारबोटकर, प्रेमानंद म्हांबरे, विश्वास चोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.